सातार्‍याला पावसाने झोडपले


सातारा :  सातारा शहर व परिसरात रविवारी दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रविवार बाजाराचा दिवस असल्याने सातारा शहरात भाजी विक्रेत्यांसह अन्य व्यावसायिकांची तारांबळ उडाली.सातारा शहर व परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी 3 नंतर विजांच्या गडगडाटात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी शहर परिसरासह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. रविवार बाजाराचा दिवस असल्याने भाजी मंडई परिसरासह अन्य व्यावसायिकांचे साहित्य पावसामुळे भिजले. त्यामुळे भाजी व्यावसायिकांसह अन्य व्यापार्‍यांची एकच तारांबळ उडाली.

सायंकाळी सातारा शहर व परिसरात एक तास पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसात काहींनी भिजण्याचा आनंद लुटला.सध्या ग्रामीण भागात खरीप हंगामातील पिकांच्या काढणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सोयाबीन, घेवडा, भुईमूग, चवळी, मूग व अन्य पिकांची काढणी सुरू आहे. मात्र अधूनमधून पडणार्‍या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिक वाया जाते की काय? असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यात कराड 5 मि.मी., कोरेगाव 0.22 मि.मी., खटाव 3.29 मि.मी., व माण तालुक्यात 0.14 मि.मी.पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

No comments

Powered by Blogger.