उंब्रज बसस्थानकाला फलकांचा विळखा


उंब्रज : पुणे येथे शुक्रवारी होर्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभर बेकायदेशीर होर्डींगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. होर्डींग लावताना ती आवश्यक त्या खात्याच्या अधिकृत परवानगी घेऊनच लावले आहेत का? याची चौकशी होणे आवश्यक आहे. दरम्यान, उंब्रज येथे महामार्ग व सर्व्हिस रस्त्यावर एक दोन ठिकाणचे होर्डींग वगळता होर्डींगचा भार हा काही ठिकाणी खाजगी इमारतींवर असल्याचे दिसून येत आहे. खाजगी इमारत मालकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.पुणे येथे होर्डींग कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्यभर बेकायदेशीर होर्डींगबाबत कारवाई होण्याची शक्यता आहे.

 उंब्रज येथे महामार्गाच्या दुतर्फा असणार्‍या सर्व्हिस रोडला तारळी पूलानजीक उंब्रजमध्ये येणार्‍या सर्व्हिस रस्त्याकडे दोन होर्डींग आणि एसटी बसस्थानकासमोर असणारे होर्डींग वगळता अन्यत्र रस्त्यालगत होर्डींग दिसत नाहीत. तर एक ते दोन ठिकाणी होर्डींगचा भार हा खासगी इमारतीवर असल्याचे दिसत आहे. तथापि खासगी इमारत मालकांनीही होर्डींगने कोणतीही दुर्घटना घडू नये व आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

येथील एसटी बसस्थानकाच्या समोर मोकळया जागेच्या कडेला अनेक होर्डींग लागले आहेत. ही मोकळी जागा वापरात नसल्याने सध्या तरी या होर्डींगपासून कोणताही धोका नाही. बसस्थानकाच्या बाहेरच्या बाजूला सर्व्हिस रस्त्याकडेला लावलेले होर्डींग वगळता अन्य कोठेही होर्डींग्ज दिसत नाहीत. दरम्यान, बसस्थानक परिसरातील होर्डिंगबाबत संबंधित व्यक्तिंशी फोनवरुन संपर्क केला असता सर्व फलक परवानगी घेऊन लावले असल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदरीत होर्डींगधारकांनी व होर्डींगला परवानगी देणार्‍यांनी कोणतीही दुर्घटना होणार नाही याची योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे, असेच म्हणावे लागेल. पुणे किंवा आडुळपेठ येथे घडलेल्या घटनेसारखी घटना येथे होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

उंब्रज येथे भराव पूल म्हणजे आपली जाहिरात करण्यासाठीच बांधला आहे की काय ? असा प्रश्‍न पडत होता. यापूर्वी भराव पूलाच्या पूर्व आणि पश्‍चिम बाजूला अनेक फ्लेक्स बोर्ड लावले जात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अशा फ्लेक्सधारकावर उंब्रज पोलिस व रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारल्यानंतर फ्लेक्स लावणे बंद झाले आहे. याठिकाणी रस्ते विकास महामंडळाची रितसर परवानगी घेऊन फ्लेक्स ऐवजी पेंटींगद्वारा जाहिरात करण्यास परवानगी दिली जात असल्याचे बोलले जात आहे. याबाबत रस्ते विकास महामंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊे शकला नाही.

No comments

Powered by Blogger.