निवडणूक कामात हलगर्जीपणा करणार्‍यांना कारणे दाखवा नोटीस


पाटण : निवडणूक कामकाजामध्ये हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याप्रकरणी पाटण तालुक्यातील 6 मतदान केंद्रांवरील 11 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यावर मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.याबाबत माहिती अशी, 1 सप्टेंबर ते 31 आक्टोबर 2018 या कालावधीत पाटण विधान सभा मतदारसंघातंर्गत मतदार यादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी तालुक्यात मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय मतदान नोंदणी अधिकार्‍यांची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार बीएलओ यांनी आक्टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी विशेष मोहीम राबवून मतदान केंद्रावर उपस्थित राहून विविध प्रकारचे फॉर्म गोळा करणे अपेक्षित आहे.

मात्र, उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी या मतदान केंद्रांना भेट दिली असता तालुक्यातील राहुडे, वजरोशी, गुजरवाडी, जुगाईवाडी, सडावाघापूर तसेच तारळे येथील पाच अशा एकूण 11 ठिकाणी अधिकारी उपस्थित नसल्याचे प्रत्यक्षदर्शी आढळून आले व सुचनेनुसार निवडणुकीचे काम करत नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच कार्यालयीन नोंदी पाहता आजपर्यंत एकही फॉर्म जमा केलेला नसल्याचे दिसून आले. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नमूद करून मतदान नोंदणीच्या कामात हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याप्रकरणी 11 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यावर मतदार नोंदणी अधिकारी श्रीरंग तांबे यांनी कारवाई करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच वेळेत खुलासा न झाल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.