शेतकर्‍यांसाठी संघर्ष करू : राजू शेट्टी


कराड : शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यरत आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वाभिमानी कटिबद्ध आहोत. अन्याय होणार्‍या ठिकाणी संघर्ष करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याचे काम आजवर केले आहे. यापुढेही हे काम सुरूच राहणार असल्याची ग्वाही खा. राजू शेट्टी यांनी दिली आहे.कराड तालुक्यात शेतकर्‍यांनी शामगाव, वाघेश्‍वर येथे कार्यक्रमाचे आयोजन करत खा. राजू शेट्टी यांचे स्वागत केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल घराळ यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शामगाव येथील शेतकर्‍यांकडून बोंबाळवाडी तलावात पाणी सोडण्याची मागणी केली जात होती. तसेच येथील शेतकर्‍यांची आठ महिन्यांपासूनची केन अग्रोची ऊस बिले थकली होती. याबाबत स्वाभिमानीने केलेल्या आंदोलनानंतर शेतकर्‍यांना न्याय मिळाला आहे. त्यामुळेच दोन्ही प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे मार्गी लागल्याने खा. राजू शेट्टी यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर वाघेश्‍वरचा गेल्या चाळीस वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रलंबित असणारा प्रश्‍न स्वाभिमानीच्या माध्यमातून मार्गी लागल्याचे सांगत ग्रामस्थांसह शेतकर्‍यांनी स्वाभिमानीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

जिल्हाध्यक्ष सचिन नलवडेे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले. गट - तट, पक्ष, जात - पात न पाहता स्वाभिमानी नेहमी शेतकर्‍यांबरोबर राहून त्यांच्या हिताला प्राधान्य देईल, असेही नलवडे यांनी यावेळी सांगितले.

अनिल घराळ यांनी मनोगत व्यक्त करुन स्वाभिमानीला साथ देण्याचे आवाहन केले. तसेच अन्यायाविरूद्ध नेहमीच संघर्ष करू अशी ग्वाही दिली. यावेळी शामगावचे शाखा अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष बापूराव पोळ, आनंदा शिंदे, शंकर पोळ, वाघेश्‍वरचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेकडो शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

No comments

Powered by Blogger.