लोणंद नगराध्यक्ष निवडीची उत्सुकता शिगेला


लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी, भाजपा आघाडी व जेष्ठ नेते अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, आनंदराव शेळके - पाटील या दोन्ही गटात नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. नगरपंचायतीमध्ये सत्ता राखण्यासाठी 9 हा जादूई आकडा असून हा आकडा कोण गाठणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. यासाठी हालचाली गतिमान झाल्या असून नगराध्यक्ष कोण होणार याचा ट्विस्ट कायम आहे.राष्ट्रवादी व भाजपा आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष सचिन शेळके व उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे किरण पवार यांना संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. यामुळे आ. मकरंद पाटील यांच्या गोटात नाराज कल्‍लोळ उडाला असून नाराजांची समजूत काढण्यात त्यांना यश येणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तर अ‍ॅड. बागवान व आनंदराव शेळके-पाटील यांच्या गोटाला 9 हा आकडा गाठण्यात यश मिळणार का? यावरच सर्व राजकीय समीकरणे अवलंबून आहे.

लोणंद नगरपंचायतीत राष्ट्रवादी 8 , कॉग्रेस 6, भाजपा 2 , व अपक्ष 1 असे बलाबल आहे. त्यामध्ये राष्टवादी व भाजपा, अपक्ष असे 11 जण एकत्र येऊन आघाडी करून सत्ता स्थापन करीत राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके - पाटील यांना नगराध्यक्षा व भाजपाच लक्ष्मणराव शेळके यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली होती. त्यानंतर एका वर्षाच सत्ताधारी गटात मतभेद निर्माण होऊन नगरपंचायतीच्या वर्तुळात बर्‍याच राजकीय घडामोडी घडल्या गेल्या .

राष्ट्रवादी अंतर्गत दोन गट निर्माण झाले. त्यामुळे नगरपंचायतीत नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके - पाटील यांनी कॉग्रेसच्या नगरसेवकांच्या साथीने कारभार सुरू ठेवला होता. या निमिताने जेष्ठ नेते आनंदराव शेळके - पाटील व अ‍ॅड. बाळासाहेब बागवान एकत्रित आले. 9 जणांनी दीड वर्ष कारभार चालवला असून 8 जण विरोधकांच्या भूमिकेत आहेत. त्यातच आता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आ. मकरंद पाटील यांच्या गटाने काँग्रेसचा एक व अपक्ष एक असे दोन नगरसेवक फोडण्यात यश मिळविल्याची चर्चा होती. त्यानुसार दहा नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाले होते. त्यानंतर आनंदराव शेळके - पाटील व अ‍ॅड. बाळासाहेब बागवान गटाचे सात नगरसेवकही टुरवर गेले होते.

राजकीय वर्तुळातील घडामोडी वेगवान झाल्या असून नव नव्या वावड्या उठवल्या जात होत्या. परंतु, त्याला दुजोरा मिळत नव्हता. त्यातच आ. पाटील गटाने सचिन शेळके व किरण पवार यांना संधी दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यानंतर नाराजीचा फायदा घेण्यासाठी राजकीय डावपेच रात्री उशीरा पर्यत आखले जात होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचा एक नगरसेवक हाती गळाला लागल्याची चर्चा असून आणखी एकादा गळाला लागणार का हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच समजून येणार आहे. या सर्व नाट्यामुळे लोणंदचे राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे.

सोमवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी सकाळी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी झाल्यानंतर अपात्र उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. 

अडीच वर्षापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान वेगवेगळी राजकीय समीकरणे निर्माण झाली होती, त्याची आठवण या निमित्ताने होत आहे. त्यावेळी नगराध्यक्ष पदाची चालून आलेली सचिन शेळ्के यांची संधी हुकली होती. यावेळी मात्र त्यांना पुन्हा संधी प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, अजून पाच दिवसाचा कालावधी असल्याने राजकारणात काहीही घडते.त्यामुळे यावेळी काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. गतवेळी काँग्रेस 6, भाजप 2, अपक्ष 1 अशी 9 जुळवाजुळव झाली होती. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी 8 ,भाजपा 2 व अपक्ष 1 अशी अकराची बेरीज करत राष्ट्रवादीने बाजी मारली होती. यावेळीही काहीसे तसेच चित्र निर्माण झाले आहे.

No comments

Powered by Blogger.