आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

सांगवीच्या ‘हेरिटेज’ दूध डेअरीवर छापा


फलटण : सांगवी, ता. फलटण येथील मेसर्स हेरिटेज फूड्स प्रा. लि. या दूध डेअरीवर अन्न व औषध विभागाने बुधवारी छापा टाकला. अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीत नमुने संशयास्पद आल्याने 898 लिटर दुधाचा साठा नष्ट करुन 12 हजार 924 किलो स्कीममिल्कच्या बॅगा जप्त करण्यात आला. सहायक आयुक्त (अन्न) शिवकुमार कोडगिरे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी केलेल्या या कारवाईमुळे भेसळखोरांत खळबळ माजली.जिल्ह्यातील फलटण, उत्तर कोरेगाव तसेच खटाव तालुक्यातील काही भागातून भेसळयुक्त दुधाची निर्मिती काही डेअर्‍यांच्यामधून केली जात आहे. कुलर पॉईंट भेसळीची केंद्रे बनले आहेत. सांगवी (ता. फलटण) येथील मेसर्स हेरिटेज फूड्स प्रा. लि. या दूध डेअरीवर अन्न व औषध विभागाने बुधवारी पहाटे छापा टाकला. अन्न विभागातून मिळालेल्या माहितीनुसार या डेअरीतून वितरित केल्या जाणार्‍या दुधात भेसळ केली जात असल्याची तक्रार कार्यालयास प्राप्त झाली होती. 

त्यावरुन सहायक आयुक्त (अन्न) शिवकुमार कोडगिरे यांनी अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनवणे, रोहण शहा, अनिल पवार यांच्यासह मेसर्स हेरिटेज फूड्स प्रा. लि. या दूध डेअरीची तपासणी केली. त्यावेळी पाश्‍चराईज्ड होमोजिनाईज्ड फूल क्रिम मिल्क दुधाची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी दुधात ‘माल्टोडेकस्ट्रीन’ आढळून आले. त्यामुळे नमुने घेवून 42 हजार 206 रुपयांचा दुधाचा 898 लिटरचा साठा नष्ट करण्यात आला. तसेच मेसर्स हेरिटेज फूड्स प्रा. लि. या दूध डेअरीमध्ये स्कीममिल्क पावडरची माल्टोडेस्ट्रिन चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे स्कीममिल्क पावडरच्या 17 लाख 44 हजार 749 रुपयांच्या 12 हजार 924 किलोच्या 517 बॅगा जप्त केल्या. घटनास्थळावरुन अधिकार्‍यांनी सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. अधिकार्‍यांनी घेतलेले नमुने प्रयोगशाळेत विश्‍लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

दसरा, दिवाळीनिमित्त मिठाई, खाद्यतेल, मैदा, आटा, रवा, खवा, सुका मेवा इत्यादीमध्ये भेसळ करण्याची शक्यता असल्याने भेसळखोरांवर कारवाई करण्याचा इशारा शिवकुमार कोडगिरे यांनी दिला आहे.