श्रवणीय गीतांतून साहित्याची ओळखकराड : ‘इंद्रायणी काठी, झुलवू नको हिंदोळा, घन निळा बरसला’ यासह सुरेल आवाजातील सुरेख, हृदयाला स्पर्श करतील अशी विविध गाणी, कविता आणि त्याचबरोबर या गाण्यांचे जनक असणार्‍या लेखकांचे भावविश्‍व उलगडून सांगणारा ‘तीन एक्के... अनलिमिटेड’ या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांसह कराडकरांची मने जिकंली. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची ओळखही झाली. येथील अभिजित कुलकर्णी व श्रीरंग कुलकर्णी यांनी येथील शिक्षण मंडळाच्यावतीने विद्यार्थी साहित्य संमेलन व ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मराठी साहित्यातील दिग्गज लेखकांची ओळख करून दिली.

 जीपीएस हे सध्याच्या आधुनिक जीवनशैलीतील महत्वाचा घटक झाला आहे. मात्र व्यावहारिक जगाशी ताळमेळ घालताना वापरण्यात येणारा जीपीएस आणि ज्यांच्या कवितेशी, कथांशी आपल्या मनाची नाळ जोडली गेली आहे ते‘जीपीएस’ म्हणजे ग. दि. माडगूळकर, पु.ल. देशपांडे, सुधीर फडके यांच्या केवळ कविता, कथाच नव्हे, तर त्यांच्या आयुष्याचे अंतरंग अभिजीत कुलकर्णी यांनी उलगडले. यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

संमेलनामध्ये प्रकाश पागनीस यांनी विद्यार्थ्यांसाठी कथाकथन केले. शंकरराव कुलकर्णी यांनी पशुपक्षांशी संवाद कार्यक्रम सादर केला. श्रीनिवास एकसंबेकर व दया एकसंबेकर यांनी ‘अभिवाचन का व कसे?’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्याधर म्हैसकर यांनी ‘काचे पलीकडील जग’ या पुस्तकाच्या निर्मितीसंदर्भात कथेमागची कथा सांगितली. यानंतर लॉग आऊट कादंबरीच्या लेखिका श्रुती मधुदिप यांची मुलाखत विद्यार्थिनींनी घेतली.‘मृत्यूंजय संभाजी महाराज’ कार्यक्रमाचे सादरीकरण वेदांतिका देसाई हिने केले. यावेळी शिक्षण मंडळाचे चेअरमन चंद्रशेखर देशपांडे, बाळासाहेब कुलकर्णी, सहसचिव राजेंद्र लाटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.