कैलास गायकवाडचा खून दोघांनी नव्हे बारा जणांनी केल्याचा आरोप


सातारा : साताऱ्यात कैलास नथु गायकवाड या तडीपार युवकाचा खून सातव्या महिन्यात झालेला असून तो खून दोघांनी नव्हे तर बारा जणांनी केला आहे. या प्रकारणाचा सीआयडी मार्फत तपास करावा. तसेच शाहूपुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून इतरांशी आर्थिक देवाणघेवाण करत त्यांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप मृत कैलास गायकवाड याच्या कुटुंबियांनी केला असून न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, दि. ११ जुलै रोजी कैलास गायकवाड याचा अर्कशाळा परिसरात निर्घृण खून झालेला आहे. कैलास गायकवाड हा तडीपार असताना साताऱ्यात त्याचा खून झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला व त्यांना अटक केली.

खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी मृत कुटुंबियांना एफआयआरची प्रत दिली नाही. कुटुंबीयांनी पुरवणी जबाब घेण्याची वारंवार विनंती केली मात्र शाहूपुरी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कैलासचा खून दोघांनी केला नसून १२ जणांनी केला आहे. पोलिसांना याबाबत वेळोवेळी सांगितले मात्र आर्थिक देवाणघेवाण झाल्याने इतर संशयित आरोपींना मोकाट सोडण्यात आले असल्याचा आरोप गायकवाड कुटुंबियांनी केला. या प्रकारणाचा तपास शाहूपुरी पोलिसांऐवजी सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी करत सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.

No comments

Powered by Blogger.