Your Own Digital Platform

झेडपीच्या पाणीपुरवठा विभागात कागद टंचाई


सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील 20 गावे व 80 वाड्यांना टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, याच विभागात गेल्या काही दिवसांपासून कागदाची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना अहवाल कसा द्यावयाचा? असा प्रश्‍न पडला आहे.जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणी विभाग हे महत्वाचे खाते म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना, साधी विहीर, विंधन विहीर, लघु नळ पाणी पुरवठा योजना, शिवकालीन पाणी साठवण योजना, अस्तित्वातील योजनांची दुरूस्ती, अस्तित्वातील योजनेतील उद्भवाचे बळकटीकरण,योजना विस्तारीकरण, पुरक योजना, नवीन नळ पाणीपुरवठा योजना,सौरउर्जेवर आधारीत दुहेरी पंप लघु नळपाणी पुरवठा योजना, सांसद ग्राम योजना, जलस्वराज्य टप्पा 2 कार्यक्रम, ग्रामीण भागात 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना, देखभाल दुरूस्ती आदी कामे पाणी पुरवठा विभागामार्फत विविध गावांमध्ये केली जातात.

सातारा जिल्ह्यात पूर्वेकडे पावसाने हुलकावणी दिली असल्याने माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा आदी तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न बनला आहे. ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात अशी अवस्था असेल तर पुढील काळात पाण्यासाठी भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे. एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागात पाण्याची नव्हे तर कागदाची टंचाई जाणवू लागली आहे. ही टंचाई गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. दुष्काळी तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर पाणी पुरवठा विभागाला कागदासाठी फिरावे लागत आहे.

पाण्याची टंचाई असल्याने केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी माहिती मागवली जात आहे. ही माहिती ऑनलाईन देण्यात येत असली तरी त्याचा स्वतंत्र प्रस्तावही द्यावा लागत आहे. मात्र, येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना एखादा रिपोर्ट जुन्या कागदावरच द्यावा लागत आहे.कागदाच्या टंचाईनेच येथील अधिकारी व कर्मचारी त्रस्त आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. ऐन टंचाईच्या कालावधीत तरी पाणी पुरवठा विभागाला कागदाचा पुरवठा प्रशासनाने करावा.