वीजतारा कितीजणांचा बळी घेणार?


सातारा : वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार सातारा जिल्हावासीयांना आता काही नवा नाही. विजेचा खेळखंडोबा, उघड्या डीपी, भरमसाठ वीज बिले, लोटांगण घालणार्‍या वीज वाहिन्या, झुकलेले विजेचे पोल अशी वीज मंडळाच्या कारभाराची जंत्रीच ग्राहकांना कुठे ना कुठे समोर येते. शेतात लोंबळकणार्‍या विजेच्या तारा आणखी किती जणांचा बळी घेणार? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

जिल्ह्यातील अनेक गावात, वाड्या ˆवस्त्यात व शेतात वाकलेले वीज खांब धोकादायक स्थितीत उभे आहेत. शेतातून गेलेल्या तारा हाताला येत असल्याने शेतकर्‍यांसह जनावरांचाही जीव धोक्यात आला आहे. उसाचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर लोंबकळणार्‍या वीज तारांमुळे दुर्घटनेची भीती अधिकच असते. मात्र त्यावर उपाययोजना होताना दिसत नाहीत.

अनेक गावांत वीज खांबांची भयावह अवस्था असून कोरेगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतात वीज खांब वाकलेले आहेत. वीज वाहक तारा जमिनीवरुन हाताला येईपर्यंत खाली आल्या आहेत. अनेक वीज खांब मजबूत पद्धतीने शेतात न रोवल्याने अनेक खांब मध्यंतरी झालेल्या वादळी पावसानंतर पुन्हा वाकले आहेत. 

अनेक ठिकाणी वीज वाहक तारा पुन्हा जमिनीवरुन हाताला येतील अशा अवस्थेत लटकत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेकदा या वीज तारांना स्पर्श होऊन जबरदस्त पावरचा शॉक लागण्याची शक्यता असते. शेतकर्‍यांनी वीज महामंडळाच्या अधिकार्‍यांकडे वाकलेलेे वीजेचे खांब तातडीने उभे करावेत, तारांचा ताण काढावा अशी वारंवार विनंती केली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच अधिकारी व कर्मचारी पळापळ करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. दुरूस्ती काही होत नाही.

 त्यामुळे शेतपिके वाळून शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागत आहे. वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कार्यालयात केवळ ठाण मांडून बसण्यापेक्षा जिल्ह्यातील वीज वितरणच्या दुरवस्थेची पाहणी करुन वाकलेले खांब, लोंबकळणार्‍या तारा, उघड्या डिपी यांची पाहणी करून त्याची तातडीने दुरूस्ती करण्याबाबतचे आदेश संबंधित कर्मचार्‍यांना द्यावेत, अशी मागणी शेतकरी तसेच ग्राहक वर्गातून होत आहे.

राज्य सरकार व वीज वितरणकडून जनतेच्या मानगुटीवर वारंवार दरवाढीचे भूत बसवले जात आहे. अनेकदा अधिक रकमेची चुकीची बिले देवून वीज कनेक्शन तोडण्याची भिती दाखवून वीज बिलांची दर महिन्याला जबरदस्तीने वसुलीही केली जात आहे. आता तर दुष्काळाचे सावट असून शेतकर्‍याला रोजीरोटीला महाग होण्याची वेळ आली आहे. 

अशावेळी अनेक ठिकाणी कर्मचारी वीज बिलासाठी आपणच जणू काही जिल्ह्याचे वीज वितरणचे कार्यकारी अभियंता असल्यासारखा अविर्भाव आणून बिल भरण्यासाठी तगादा लावत आहेत. अशा कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांनी आवर घालावा, अन्यथा स्थानिक जनताच मग्रुर कर्मचार्‍यांना सोलटून काढल्याशिवाय राहणार नाही. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे.

No comments

Powered by Blogger.