Your Own Digital Platform

चालकांवर कठोर कारवाई करण्याची सईच्या नातेवाईकांची मागणी


कराड : दोन दिवसांपूर्वी सई वाडेकर या चिमुकलीला चिरडल्यानंतर संबंधित चालकानेच मारहाण केल्याची खोटी तक्रार केल्याचा दावा करत नातेवाईकांसह संतप्त जमावाने कार चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी बुधवारी सकाळी सुईच्या नातेवाईकांसह कराडमधील शेकडो लोक शहर पोलिस ठाण्यात जमा झाले होते.

सुई वाडेकर या सहा वर्षाच्या चिमुकलीला सोमवारी रात्री दहाच्या सुमारास कराडमधील सोमवार पेठेतील पंताचा कोट येथील अंबाबाई मंदिर परिसरात निसर्ग अरूणकुमार शहा (रा. रूक्मिणीनगर, कराड) याने आपल्या कारने चिरडले होते. मोबाईल संभाषण करत रस्त्याकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे कार चालवून सईच्या मुत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका निसर्ग शहा याच्यावर पोलिसांनी ठेवला आहे.

दरम्यान, दोन दिवसानंतरही शहा याच्यावर कारवाई न झाल्याने सईच्या नातेवाईकांसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी सभापती विजय वाटेगावकर, विजय यादव यांच्यासह शुक्रवार आणि पंताच्या कोट परिसरातील नागरिक, माहिलांनी बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कराड शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांशी विक्रम पावसकर यांच्यासह नातेवाईकांनी चर्चा केली. चिमुकलीला चिरडल्यानंतर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही नागरिकांनी त्याला अडवले. मात्र आता आमच्याविरूद्धच मारहाण केल्याची तक्रार दाखल करणे म्हणजे हा कोणता न्याय? असा प्रश्नही संतप्त नातेवाईकांनी उपस्थित केला. 

मात्र संबंधित चालक रूग्णालयात उपचार घेत असल्याने कारवाई करणे शक्य झालेले नाही. मात्र संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात येऊन कठोरातील कठोर कलमांचा यात समावेश करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी जमावाला दिली. त्यानंतर जमाव पोलिस ठाण्यातून निघून गेला आहे.