पाटणने घेतला स्वच्छतेचा वसा


पाटण : स्वच्छतेतून समृद्धीकडे या उपक्रमात पाटण तालुक्यातील अनेक गावांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. तालुक्यात हागणदारीमुक्त व निर्मलगाव यासह आता प्लास्टिक बंदीसाठीचे सार्वत्रिक प्रयत्न हे निश्‍चितच पर्यटन विकास व आरोग्यदायी जीवनासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत. नैसर्गिक, भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा असलेल्या या तालुक्यात स्वच्छता, आरोग्य याचे महत्व पटवून देणे हे आव्हान होते. 2007 मध्ये पंचायत समिती सभापती पदी विराजमान होताच युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी हे आव्हान स्वीकारून यासाठी सातत्याने जनजागृती, प्रोत्साहनपर उपक्रम राबवत संपूर्ण तालुका निर्मल व तंटामुक्त केला. काही ठिकाणी लोकचळवळीतून तर काही ठिकाणी कारवाईचे दांडके हातात घेऊन वेळप्रसंगी गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून ही चळवळ यशस्वी करण्यात आली.

निसर्ग समृद्धीने नटलेल्या याच तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी सध्या सार्वत्रिक प्रयत्न सुरू आहेत. यातील महत्वाची बाब म्हणजे स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती. जगभरात प्लास्टिक ही सर्वात मोठी डोकेदुखी आहे. विद्यमान पंचायत समिती पदाधिकार्‍यांनी तालुक्यात प्लास्टिक बंदी मोहीम हाती घेतली आहे. त्याला तितक्याच प्रमाणावर प्रतिसादही मिळत असल्याने प्लास्टीकमुक्ती चळवळीला गती आली आहे. 

स्वच्छतेचे महत्व पटल्याने आता ती समस्या कमी झाली. त्याचवेळी कचर्‍याची विल्हेवाट याबाबत आवश्यक त्या उपाययोजना होणेही तितकेच गरजेचे आहे. शासन स्तरावरून याबाबत शहरांना महत्व दिले जात आहे. ग्रामीण भागात ही चळवळ रुजली तर पाटण तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होईल. 

स्वच्छतेमध्ये सातारा जिल्हा अग्रस्थानी गेल्यामुळे निश्‍चितच याबाबत सार्वत्रिक प्रतिमा उंचावली आहे. अशा उपक्रमात पाटण तालुका हादेखील नेहमीच पुढे असतो. यापुढे हा जिल्हा प्लास्टिक मुक्ती व कचरा विल्हेवाट यातही अग्रस्थानी असावा अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. शासनस्तरावरून यासाठी मदत व प्रोत्साहन मिळावे अशी मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.