कासवर आज ऑनलाईन बुकिंग करणार्‍यांनाच प्रवेश


बामणोली : जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पुष्प पठाराला भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून कास पठारावर येणार्‍या पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, कास पुष्प पठाराचे संवर्धन व संरक्षण करणे या गोष्टीकरिता दि. 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी फक्त ऑनलाईन बुकिंग असणार्‍या पर्यटकांनाच कास पठारावर प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती कास कार्यकारी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली.शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांबरोबर ऑनलाईन बुकिंग न केलेल्या पर्यटकांची संख्यादेखील प्रमाणापेक्षा जास्त होती. 

त्यामुळे कास पठारावर नियोजनासाठी असणारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व कास कार्यकारी समितीचे कर्मचारी यांची त्रेधा तिरपिट उडाली. त्यामुळे काही पर्यटकांना नाहक त्रास झाल्याचे समितीच्या कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. बाहेरून येणार्‍या पर्यटकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता दि. 2 ऑक्टोबर रोजी सातारा शहरातून पर्यटक कासकडे प्रवेश करताना बोगदा याठिकाणी चेकिंग करून ऑनलाईन बुकिंग असणार्‍या पर्यटकांनाच कासकडे प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

No comments

Powered by Blogger.