सुंदरगडाचे सौंदर्य दुर्लक्षित


मारुल हवेली : पाटण तालुक्यातील नैसर्गिक विविधतेने पर्यटकांना भुरळ घातली असून त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा लोंढा लागला आहे. त्यातच अनोख्या अशा अखंड कातळकोरीव सुंदरगड -दातेगड येथील तलवार विहीर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. मात्र या गडाच्या सौर्द्य शासनाच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित राहिले आहे.पाटण तालुक्यात कोयना धरणासह ओझर्डे धबधबा, वनकुसवडे येथील पवनचक्की प्रकल्प, चाफळ येथील राम मंदीर, धारेश्‍वर दिवशी येथील शिवमंदीर आदीसह अनेक पर्यटन स्थळाकडे राज्यातील पर्यटकांचा ओढा वाढला आहे. याचबरोबर पाटण पासून पाच किलोमीटरवर अंतरावर असणार्‍या वैभवसंपन्न, आपल्या अंगा खांद्यावरील अनोख्या दुर्गवैशिष्टांनी गर्भश्रीमंत असणार्‍या सुंदरगड दुर्गसंवर्धकांमुळे कात टाकत आहे.

गतवर्षी 4 थे दुर्ग संमेलन सुंदरगडावर झाल्यापासून सातारा जिल्ह्यातील 200 पेक्षा जास्त दुर्गमित्राकडून महिन्याला दोन दिवस वाखण्याजोगे संवर्धनाची कामे केली जात आहेत. यामुळे गडाच्या वैभवात दिवसेंदिवस भर पडत आहे. इतिहास प्रसिध्द सातारा गडकोटांनी संपन्न आहे. इथले दुर्ग प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, वासोटा, वसंतगड आदी सुप्रसिद्ध किल्ले आबालवृद्धांना परिचित आहेत. सुंदरगडाचा आकार, विस्तार आणि गडमाथा अतिशय आटोपशीर असला तरी येथील तलवार विहीर कातळकोरीव अखंडीत अनेक वैशिष्यांनी भरलेली आहे. विहीरीमध्ये उतरण्यासाठी दोन्ही बाजूने लहान मोठ्या पाय-याची खास रचना आहे.

तालुक्यातील सह्याद्री रांगेत डौलणारा नावाप्रमाणे सुंदर असणारा सुंदरगड, मात्र दुर्गसंवर्धकांच्या मते आजच्या परिस्थित सौंदर्याला जाणिवपुर्वक उपेक्षित ठेवले गेले आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे येथील अनेक अवशेष जमिनदोस्त झाले आहेत. विहीर पाहून गडाच्या उत्तर टोकावर जाताना गडाची तटबंदी,अनेक वास्तूंचे चौथरे, पाण्याची टाकी,ध्वजस्तंभ त्याच बरोबर इतर अनेक दुर्गअवशेष आपल्याला पहायला मिळतात. 

कराड -चिपळूण मार्गावर देखरेख करण्यासाठीच या गडाची निर्मिती झाली असावी याची कल्पना आपल्याला गडावरून आजूबाजूला दिसणारा प्रदेश पाहताना येते. सुदंरगडचे आकर्षण म्हणजे अखंड कातळात कोरलेली तलवार आकाराची विहीर होय. विहिर पाहून स्थापत्यकारांना सलामच ठोकावा वाटतो. ज्या प्रमाणे तलवारीला मुठ, पाते, टोक आदी अंगे असतात तशी विहीर तलवारीच्या आकाराशी असलेले साम्य दर्शवते. टोकाकडून विहिरीत उतरण्यास देखण्या पाय-या कोरलेल्या आहेत. विहिरीत मोठे गज शिल्प कोरले आहे. माथ्यापासून पाय-या उतरून पायथ्याशी गेल्यावर डाव्या बाजूला मंदीरवजा भाग कोरून त्यात शिवलिंग स्थापिले आहे. व समोरच नंदी आहे. येथे बारा महिने विहिरीत पाण्याचा मुबलक साठा असल्याचे दिसून येते.

No comments

Powered by Blogger.