औंध पोलिस वसाहतीचे तीन तेरा


औंध : औंध येथील मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ब्रिटीश कालीन पोलीस वसाहतीच्या इमारतीचे तीन तेरा वाजले आहेत. पोलिस कर्मचार्‍यांच्या निवासस्थांची दूरवस्था झाली असून पोलिस कर्मचार्‍यांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने पोलिस कर्मचार्‍यांतून नाराजी व्यक्त होत आहे. औंध पोलिस वसाहत अनेव समस्यांच्या गर्तेत सापडली आहे.औंध पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणार्‍या 40 गावांसह पुसेसावळी पोलिस दुरक्षेत्राचा कारभार चालतो. येथे मोठा पोलिस कर्मचारी वर्ग असून सध्या 30 ते 35 पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. ही पोलिस वसाहत ब्रिटीश कालीन असून पोलिस कर्मचार्‍यांच्या निवासासाठी वसाहत उभारण्यात आली आहे. मात्र मागील काही वर्षामध्ये या इमारतीला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. ही इमारत मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी आहे. हे ठिकाण अतिशय शांत व विलोभणीय, निसर्गाच्या सानिध्यात आहे. पण पोलीस कर्मचार्‍यांच्या खोल्यांच्या दूरवस्थेमुळे हे ठिकाण अडगळीचे ठिकाण बनले आहे.

या निवासस्थानांच्या स्लँपला गळती लागली आहे. भिंतीतून पाणी पाझरत आहे. खोल्यांच्या इमारतीच्या खिडक्यांची मोड-तोड झाली आहे. पावसाळ्यात वारा व पाण्यापासून संरक्ष होण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांनी खिडक्यांना पडदे, पुठ्ठे बसवले आहेत.वसाहतीमध्ये येणार्‍या रस्त्याचीही दूरवस्था झाली आहे. परिसरात गवत वाढले आहे. अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. अनेक खोल्यांमधील नळ कनेक्शन लिकीज आहेत.अस्वच्छता वाढल्याने सरपटणार्‍या प्राण्यांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे येथील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियाच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने सध्या ही वसाहत ओस पडली आहे.

निवासस्थानात असणार्‍या शौचालयांचीही दूरवस्था झाली आहे. अनेक शौचालयांचे दरवाजे तुटून पडले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात झाडे व झुडपे उगवली आहेत. याकडे पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्याने या वसाहतीला बकाळ स्वरुप प्राप्त झाले आहे. ही बसाहत अनेक समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. निवासस्थानांची दूरवस्था व सेवा सुविधांचा अभाव असल्याने पोलिस कर्मचारी वडूज, सातारा, कराड येथे वास्तव्यास गेले आहेत. ते तेथूनच ये-जा करुन आपली ड्युटी निभावत आहेत. कर्मचारी वर्गाची होणारी हेळसांड वेळीच थांबावी, अशी मागणी औंधवासियांतून होत आहे.

No comments

Powered by Blogger.