Your Own Digital Platform

सातारा तहसीलदारांची कामेरीत बेकायदा वाळू उपशावर कारवाई


सातारा : कामेरी, ता. सातारा येथील कृष्णा नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी रविवारी रात्री कारवाई केली. याप्रकरणी संदीप सुगंधराव घाडगे (रा. कामेरी) यांचा जेसीबी जप्त करण्यात आला असून त्यांना सुमारे 10 लाखांचा दंड होण्याची शक्यता आहे.

सातारा तालुक्यात अद्याप चोरून वाळू उपसा केला जात आहे. प्रशासनाकडून कारवाई होत असली तरी बेकायदा वाळू काढण्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. कामेरीत कृष्णा नदीपात्रात सातारा तहसील कार्यालयाने अनेकदा कारवाई केली आहे. या ठिकाणी पुन्हा बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल तसेच प्र.सातारा प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी रविवारी रात्री उशिरा कारवाई केली. कृष्णा नदीपात्रात संदीप सुगंधराव घाडगे हे जेसीबीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा करत असल्याचे आढळले. त्यांचा जप्त केलेला जेसीबी (क्र. एमएच 11 यू 4664) बोरगाव पोलिस ठाण्यात लावण्यात आला आहे. संदीप घाडगे यांच्याकडून सुमारे 10 लाख रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.

या कारवाईत अपशिंगे मंडलाधिकारी वैभव सोनावणे, तलाठी कैलास भोसले, मैसनावड, निकम सहभागी झाले होते. तालुक्यात कोणत्याही प्रकारचे अवैध गौण खनिज उत्खनन खपवून घेणार नाही, असा इशारा सातारा तहसिलदारांनी दिला आहे.