कास पठार हाऊसफुल्‍ल


सातारा : जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या कास पठारावर रविवारी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील पर्यंटकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे कास पठार रंगी बेरंगी फुलांसह पर्यटकांच्या गर्दीने हाउसफुल्ल झाले होते. सध्या पावसाचे वातावरण असून हेे वातावरण असेच राहिले तर ऑक्टोबरअखेर फुलांचे गालिचे पठारावर पहावयास मिळणार आहेत.कास पठारावरील फुलांचा महिमा राज्यासह विदेशात पोहोचला आहे. 

त्यामुळे पठारावर फुलांचा रंगी बेरंगी नजराणा पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची अक्षरश: रीघच लागली आहे. शनिवार, रविवार व शासकीय सुट्टी असेल त्या दिवशी तर पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे कास पठाराकडे वाहनांतून जात असतात. त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीसह होणारी वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वन विभाग व कास पठार कार्यकारी समितीने शनिवार, रविवार व अन्य सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन बुकींग असणार्‍या पर्यटकांनाच कास पठारावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवार व रविवारी तर कास पठार पर्यटकांच्या गर्दीने चांगलेच फुलून गेले होते. फुलांच्या रंगीबेरंगी छटा पाहून बहुतांश पर्यटक आपल्या मोबाईलमध्ये फुलांच्या रंगछटा टिपताना दिसत होते.कर्नाटक, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली येथील सुमारे 6 हजारहून अधिक पर्यटकांनी पठारावर हजेरी लावली होती. रात्री उशिरापर्यंत कास पठारावर पर्यटकांची गर्दी होती. यावेळी वनविभागाचे कर्मचारी व समितीचे सदस्य पर्यटकांना विविध फुलांची माहिती देत होते.पावसाचे वातावरण असेच राहिले तर फुलांच्या विविध रंग छटा ऑक्टोबरअखेर पहावयास मिळणार असल्याचे मेढ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंभाळे यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.