लोकसभा-विधानसभा शिवसेना स्वबळावर लढवणार : बानुगडे पाटील


फलटण : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याचे राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्‍चित झाले असल्याने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यादृष्टीने पक्षपातळीवर संघटनात्मक बांधणी सुरु असल्याची माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. नितीन बानुगडे पाटील यांनी दिली.फलटण तालुक्यात बुथ व गटप्रमुखांच्या नेमणुका आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने प्राथमिक बैठकीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात ना. बानुगडे पाटील पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, तालुका प्रमुख स्वप्नील मुळीक यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस -राष्ट्रवादीने विकासाची कामे केली नसल्याने लोकांनी शिवसेना भाजपाला सत्तेची संधी दिली मात्र, सत्तारुढ भाजपाने गेल्या 4 वर्षांत जनसामान्यांची नाराजी ओढवून घेतली असल्याने शिवसेेनेने या 4 वर्षांत सक्षम विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडीत लोकांच्या हिताविरुध्द होणार्‍या निर्णयांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. आता स्वबळावर निवडणुका लढवून कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेेनेचा मुख्यमंत्री असला पाहिजे, ही भूमिका घेतली आहे.

राज्याच्या कायम दुष्काळी पट्टयातील शेतीला पाणी मिळाले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यामुळेच राज्याच्या वाट्याचे 595 टीएमसी पाणी ऑगस्ट 2000 अखेर अडविण्यात महाराष्ट्र राज्य यशस्वी झाले. कृष्णा खोर्‍यातील प्रलंबीत पाटबंधारे प्रकल्पाची कामे आगामी काळात पूर्ण करुन लाभ क्षेत्रातील लोकांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ना. बानुगडे पाटील यांनी स्पष्ट केले.

नीरा-देवघर या सुमारे 11.5 टी.एमसी क्षमतेच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून कालव्यांची कामे झाली नसल्याने या प्रकल्पाचे पाणी लाभ क्षेत्राऐवजी लाभक्षेत्राबाहेरील बारामती, इंदापूर, माळशिरस या तालुक्यांना दिले जाते. बारामतीला पाणी पळवले जात आहे. ते कोणत्या आधारे नेले याची माहिती घेऊन याबाबत पुणे येथील कार्यालयात लवकरच बैठक घेणार असल्याचे ना. बानुगडे पाटील यांनी सांगितले.

नीरा उजवा व डावा कालवा त्याचप्रमाणे धोम व अन्य पाटबंधारे प्रकल्पांचे कालवे जीर्ण झाल्याने त्यांची दुरुस्ती तसेच या कालव्यावरील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन ते धोकादायक असतील तर त्याठिकाणी नवीन पुलांची उभारणी करण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना देणार असल्याचे ना. बानुगडे-पाटील यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.