Your Own Digital Platform

पालकमंत्री नव्हे खातेदार म्हणून तरी पाणी द्या


फलटण : राज्य शासनाने फलटण दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केल्यानंतर पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी सोमवारी तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाची पाहणी करून बैठक घेतली. दुष्काळ मिटवण्याबाबत सूचना केल्यानंतर पत्रकारांनी फलटण तालुक्याचे खातेदार म्हणून पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी निरा-देवघरचे कालवे पूर्ण करावेत, अशी मागणी केली. ही मागणी ऐकताच जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व अधिकारी अचंबित झाले. मात्र, ही मागणी ऐकताच ना. विजय शिवतारे यांनी बैठक आटोपती घेऊन काढता पाय घेतला. सोमवारी फलटण पंचायत समितीच्या सभागृहात ना. विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई बैठक झाली. यावेळी आ. दीपक चव्हाण, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सभापती सौ. प्रतिभा धुमाळ, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना चालवणार्‍या ग्रामपंचायतीची देखभाल खर्चाच्या तुलनेत वसूली होत नसल्याने ग्रामपंचायती आर्थिक संकटात सापडतात. त्यासाठी सक्षम जल उद्भव, प्रभावी यंत्रणा असलेल्या या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनातून लगतच्या शेतीला काही प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देवून त्या शेतकर्‍यांकडून दुरुस्ती देखभाल व विजेच्या खर्चासह काही प्रमाणात पाणीपट्टी वसूल केल्यास या योजना सक्षम होतील. फलटण तालुक्यातील बंद पडलेल्या योजनांचे प्रस्ताव करण्याच्या सूचना ना. शिवतारे यांनी दिल्या.

जनावरांसाठी चार्‍याचे नियोजन करताना बागायती पट्ट्यात चारा पिके घ्यावीत. त्यातून बागायती व जिरायती दोन्ही भागातील जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध होवू शकेल. त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी असलेला निकष बदलून द्यावा. त्यासाठी प्रसंगी अधिक्षक अभियंता किंवा मुख्य अभियंत्याशी चर्चा करावी. मात्र, कोणत्याही परिस्थितीत जास्त वेळ वीज पुरवठा खंडीत राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.

यानंतर बैठकीला उपस्थित पत्रकारांनी नीरा-देवघर प्रकल्पात गेल्या 5 वर्षांपासून पूर्ण क्षमतेने पाणी साठा होत आहे. हे पाणी ज्यांनी त्याग करून पुनर्वसन व कालव्यासाठी जमिनी दिल्या त्या फलटण तालुक्यातील नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, असे न होता हे पाणी बारामती, इंदापूर तालुक्याला दिले जात आहे. त्यामुळे खातेदार म्हणून फलटणला पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. ना. शिवतारे हे खातेदार असल्याचे ऐकताच जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व अधिकारी अचंबित झाले. मात्र, एकंदर रंगरुप पाहून ना. शिवतारे काही क्षणात ताडकन उठले व सुरु असलेल्या टंचाई आढावा बैठकीचा समारोप केला.

ना. विजय शिवतारे यांच्या मुलाची म्हणजेच विनय शिवतारे यांची व इतरांची मिरढे (ता. फलटण) येथे सुमारे 44 एकर (17 हेक्टर 68 आर) एवढी जमीन आहे. यातील सुमारे साडे बावीस एकर (9 हेक्टर 14 आर) जमीन पोटखराब आहे. उर्वरित क्षेत्र सुमारे बावीस एकर जमीन लागवडी लायक आहे. 2010 सालापासून ते 2016 सालापर्यंत लागवडी लायक काही क्षेत्रांवर ज्वारीचे पीक घेतले होते. 2016-17 व 2017-18 सालात हे सर्व क्षेत्र नापेर म्हणून शासनाच्या दरबारी नोंदवण्यात आले आहे. मिरढे गावाच्या पायथ्यालाच शिवतारे यांची ही जमीन आहे. ना. शिवतारे यांच्या सुपुत्राची फलटण तालुक्यात जमीन आहे, हे ऐकूनच अनेकांनी भुवया उंचावल्या.