कोयना प्रकल्पातून वीजनिर्मितीचा उचांक


पाटण : जून ते सप्टेंबर या पाऊसकाळात कोयना जलविद्युत प्रकल्पातून 27.77 टीएमसी पाण्याचा वापर करून तब्बल 817 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. सिंचन विभागाच्या नव्या संकल्पनेतून यावेळी कोयना धरण पायथा वीजगृहातून अपवाद वगळता अखंडित वीजनिर्मिती केल्याने विनावापर पाणी सोडण्यापेक्षा त्याचा काही प्रमाणात वापर झाल्याने येथून सरासरी पेक्षा जास्त वीजनिर्मिती करण्यात यश प्राप्त झाले आहेकोयना धरणातील पाण्यावर चार टप्प्यात जलविद्युत निर्मिती केली जाते.

 या पूर्ण झालेल्या चार महिन्यांत पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 15.84 टीएमसी पाण्याचा वापर करून पोफळी प्रकल्पातून 305.275 द. ल. यु. , कोयना चौथा टप्पा 276.556 द . ल. यु. व अलोरे प्रकल्पातून 178.372 अशी एकूण 760.193 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. पूर्वेकडील विभागात सिंचनासाठी सोडण्यात येणार्‍या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येते. यावेळी सिंचनासाठी सोडण्यात येणार्‍या 3.48 व पुरकाळात काही पाणी धरणाच्या सहा वक्री दरवाजातून विनावापर सोडण्याऐवजी पायथा वीजगृहातून सोडून त्यातून वीजनिर्मिती करण्यात यावी या उद्देशाने वापरण्यात आलेल्या 8.45 अशा एकूण 11.93 टीएमसी पाण्यावर 56.389 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालूवर्षी एकूण येथे जास्त पाणी वापर करून ज्यादा 17 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आल्याने याचा राज्याच्या महसुलात वाढ झाली आहे.

पश्‍चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्पात पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथून जास्त वीजनिर्मिती होते. मात्र त्याच्या तुलनेत कोयना धरणाच्या भिंतीला लागूनच खालच्या बाजूला असणार्‍या पायथा वीजगृहातून पाणी वापराच्या तुलनेत कमी वीजनिर्मिती होते. पश्‍चिमेकडील प्रकल्पांसाठी 15.84 टीएमसी पाण्यावर तब्बल 760.193 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी पायथा वीजगृहात 11.93 टीएमसी पाणी वापर होवून केवळ 56.389 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.

No comments

Powered by Blogger.