‘चोरट्यांचा नारा..जनावरे चोरा’


सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गाई, म्हैशी, शेळ्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. याबाबत पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल होतात मात्र त्याचा तपास रामभरोसे राहत असल्याने चोरट्यांचे फावले आहे. त्यामुळे घरफोडी, लुटमारीप्रमाणेच आता ‘चोरट्यांचा नारा..जनावरे चोरा’ असा प्रकार पहावयास मिळत आहे. दरम्यान, चोरीला गेलेली जनावरे शोधून काढण्यासाठी पोलिस पैसे घेत असल्याचेही समोर आल्याने शेतकरी वैतागला आहे.

सातारा शहर परिसरातील उपनगरांमध्ये म्हैशी, गाई चोरीला जाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्यांमध्ये पाच गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोडोली, शाहूनगर, शिवथर येथील घटनांचा समावेश आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अशाचप्रकारचे चित्र असल्याचे वास्तव आहे. जनावरे घराशेजारी बांधलेल्या अवस्थेतून रात्रीच चोरटे गायब करत आहेत. याशिवाय चरायला गेलेल्या जनावरांनाही टार्गेट केले जात आहे.

चोरट्यांकडून जनावरे चोरण्यासाठी वाहनांचा बिनधोकपणे वापर होत आहे. जनावरे चोरल्यानंतर ती दुसर्‍यांना विकणे तसेच जनावरांच्या बाजारात विकणे व बर्‍याचदा कत्तलीसाठीही चोरीच्या जनावरांचा वापर केला जात आहे. जनावरे ज्या प्रकारची सापडतात त्यानुसार त्याची तेथे तेथे विक्री होते. दुभती जनावरे रग्गड किमतीला तर भरडी जनावरे चार-पाच हजार रुपयांपर्यंतही विकली जात आहेत. जनावरे चोरीला गेल्यानंतर सुरुवातीला त्याच्या मालकाकडून जनावरे शोधण्याचा प्रयत्न होतो. एक-दोन दिवस वाट पाहून बहुतेकदा पोलिस ठाण्यात तक्रार सुध्दा दिली जात नाही. पोलिस ठाण्यात अशाप्रकारे तक्रार गेल्यानंतर पोलिसही त्याची फारशी गंभीर दखल न घेता जनावरांच्या मालकाला जनावरे शोधण्याचा सल्ला देतात.

जिल्ह्यात सध्या दुष्काळाचे गडद सावट आहेत. माण-खटाव, फलटणसह ठिकठिकाणी परतीचा पाऊस न पडल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना जनावरांच्या दुधापासून जगण्यापुरते कसेबसे साधन उपलब्ध होते. मात्र चोरट्यांच्या भितीपुढे शेतकरी हैराण झाले असून त्यांचा पर्दाफाश करावा, अशी मागणी होत आहे. यामुळे गाई, म्हैस, शेळ्या अशी जनावरे चोरी झाल्यानंतर त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन घ्यावी व त्याचा तपास लागावा, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून होत आहे. पोलिसांना जनावरे सापडल्यानंतर त्यांच्याकडून लाचेपोटी पैशांची मागणी होते, यामुळे पोलिस ठाण्याच्या इनचार्ज अधिकार्‍यांनी अशा प्रकरणात स्वत: लक्ष घालून शेतकर्‍यांची पिळवणूक होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

No comments

Powered by Blogger.