प्रेमाच्या धबधब्याचा लिंगमळ्यावरून कडेलोट


महाबळेश्‍वर : शालेय वयापासूनच फुललेल्या प्रेमाच्या धबधब्याचा महाबळेश्‍वरच्या लिंगमळा धबधब्यावरून झालेला कडेलोट हृदयद्रावक ठरला. महाबळेश्‍वर येथील प्रसिद्ध लिंगमळा धबधब्यात हाताच्या नसा कापून उडी मारून आत्महत्या केलेले प्रेमिक हे माध्यमिक शालेय जीवनापासूनच प्रेमिक असल्याचे स्पष्ट झाले असून दोघांचेही वडील सैन्यात होते. त्यांची नेमणूक बेळगावला असतानाच या दोघांची प्रेमकहाणी तेथे फुलली असल्याचे स्पष्ट झाले आहे.अविनाश हा निंबवी, जि. अहमदनगर येथील राहणारा असून प्रियांका ही आपल्या पतीबरोबर नर्‍हे, ता. हवेली जि. पुणे येथे रहात होती. प्रियांकाला दोन लहान मुले असून ती बाहेर जाते, असे सांगून पतीच्या घरातून बाहेर पडली होती. प्रियांका लवकर घरी न आल्याने तिच्या पतीने सिंहगड पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली.

अविनाश शिर्के व प्रियांकाचे वडील हे दोघेही सैन्यात होते. त्यांची नेमणूक बेळगाव येथे होती. आजूबाजूलाच राहत असल्याने अविनाश आणि प्रियांका हे आठवी ते दहावीच्या वर्गात असताना त्यांची ओळख झाली. त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. काही काळानंतर प्रियांकाचे लग्न झाले. ती पतीबरोबर नर्‍हे येथे राहण्यास आली. तर अविनाश हा अहमदनगर येथे रहात होेता. दरम्यानच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा दोघे एकमेकांच्या संपर्कात आले व पुन्हा प्रेमाचे नाते अधिकच घट्ट झाले. यातूनच त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.

प्रियांकाच्या पतीने दाखल केलेल्या मिसिंगच्या तक्रारीची दखल घेवून सिंहगड पोलिसांनी मोबाईल फोन लोकेशनच्या आधारे प्रियांकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता प्रियांकाच्या मोबाईलवर अविनाश शिर्के यांचा शेवटचा फोन आल्याचे दिसून आले. अविनाश यांच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे अविनाश यांच्या फोनवर त्याच्या वडिलांचा फोन आल्याचे स्पष्ट होताच सिंहगड पोलिसांनी पुढील चौकशीसाठी त्यांना सिंहगड पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. दरम्यान, हे दोघे महाबळेश्‍वर परिसरात असल्याचे सिंहगड पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. अविनाशचे वडील सिंहगड पोलिस ठाण्यात आले असताना त्याच दरम्यान महाबळेश्‍वर पोलिसांना अविनाश यांच्या जवळील साहित्यात वडिलांचे व्हिजिटींग कार्ड मिळाले होते. त्या कार्डवरील नंबरवर संपर्क केला असता अविनाशचे वडील सिंहगड पोलिस ठाण्यात आले होते. तेथेच त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली.

No comments

Powered by Blogger.