सिव्हीलमध्ये रुग्णांना स्वस्तात मरणयातना


सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय अर्थात सिव्हील हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून रुग्णांना स्वस्तात मरणयातना अनुभवयास मिळत आहेत. रुग्णवाहिका ज्या तत्परतेने रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करते, त्या तत्परतेने रुग्णालयात उपचार मिळत नाहीत. त्यामुळे असंवेदनशील डॉक्टरांची मुजोरी सर्वसामान्य रुग्णांच्या जीवावर उठली असली तरी अशा प्रकारांना वेसन घालण्यात अद्याप प्रशासनाला यश आलेले नाहीजिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या सातार्‍यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये रोज सुमारे दीड हजार रुग्ण जिल्ह्यातून उपचारासाठी येत असतात. त्याचबरोबर अपघातासह विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना सिव्हीलमध्ये उपचार दिले जात असल्याने प्रत्येक कक्षात रुग्णांची गर्दी असते. 

तज्ञ डॉक्टर रुग्णालयात फक्त हजेरी लावत असल्याने दर्जेदार उपचार कागदावरच राहिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर या प्रश्‍नावर तोडगा काढू शकलेले नाहीत. अशातच काही महीला डॉक्टरही शुल्लक कारणांवरून सेवा न बजावता पगार लाटत असल्याने सध्या सुरु असलेल्या कारभारावर उपसंचालक अथवा जिल्हाधिकार्‍यांनी ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे. सिव्हीलमध्ये 40 डॉक्टर असून त्यांना पुरुष-महिला कक्षातील रुग्णांसह ओपीडी पहावी लागते. यासह शस्त्रक्रिया विभागात स्वतंत्र तज्ञ डॉक्टर आहेत. मात्र, येथील सुविधा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. 

विशेष म्हणजे शस्त्रक्रिया विभागातील रेफ्रिजरेटर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने तज्ञांचीही धुसफूस सुरु आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात डॉ. अमोद गडीकर अपयशी ठरल्याचा आरोप रुग्ण व नातेवाईक करत आहेत. नुकत्याच झालेल्या डिपीसीच्या बैठकीत सर्वच आमदारांनी जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. डॉक्टर व अधिकारी मुजोरी करत आहेत. त्यामुळे रुग्णांना सह्यासाठी ताटकळत तासन-तास उभे राहावे लागत आहे. तर अनेक आरोग्य सुविधांच्या फायदा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

जिल्हा रुग्णालयात शासनाने नेत्र तपासणीसाठी तीन वर्षापूर्वी सुमारे 1 कोटी किंमतीची मशीन पाठवली. मात्र, लालफितीचा कारभार अजब असून या मशीनचे कव्हरही अद्याप उघडण्यात आलेले नाही. त्यामुळे या मशीनला गंज लागतोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्याधुनिक मशीन नसल्यामुळे आरोग्य सुविधा मिळत नसताना ज्या काही अत्याधुनिक मशीन उपलब्ध आहेत त्यासुध्दा बंद असल्याने सिव्हीलचा हा भोंगळ कारभार रुग्णांच्या जीवावर उठला आहे.

No comments

Powered by Blogger.