गावागावांमध्ये घुमणार स्वच्छता अभियानाचा डंका


केडंबे : गावा-गावातील स्वच्छता अभियानाला पुन्हा एकदा गती मिळावी या उद्देशाने नव्याने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी स्वच्छ प्रभाग ते स्वच्छ गावचे मूल्यांकन करुन त्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती जावली पंचायत समितीच्या सभापती सौ. अरुणा शिर्के यांनी दिली.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविताना सार्वजनिक व वैयक्तिक स्वछतेचे घटक , शौचालय, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आदी घटकांची तपासणी करताना प्रथम उत्कृष्ट प्रभाग निवडून अशा प्रभागास दहा हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. या स्पर्धेत सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी केले आहे.

ग्रामस्वच्छता अभियानाची स्पर्धाही शंभर गुणांची असून या स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी पाच ग्रामपंचायतींचा एक गट तयार करून त्याची तपासणी करण्यासाठी एक समिती नेमली असून सरपंच या सामितीचे अध्यक्ष आहेत. ग्रामसेवक सदस्य सचिव, शाळा मुख्याध्यापक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा पाच स्तरावर होणार असून 10 हजार ते 25 लाखापर्यंत रोख रकमेची बक्षिसे विजेत्या ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट प्रभागाचे मूल्यांकन 1 ते 30 ऑक्टोबरअखेर होणार असून विजेत्या प्रभागास दहा हजार रुपयाचे बक्षिस मिळणार आहे तर जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींचे मूल्यांकन दि 1 ते. 31 डिसेंबर या कालावधीत होणार असून विजेत्या ग्रामपंचायतीस पन्नास हजार रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. 

दि. 1 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीत जिल्हास्तरावरील मूल्यांकन होणार असून प्रथम विजेत्या ग्रामपंचायतीस पाच लाख , द्वितीय क्रमांकास तीन लाख तर तृतीय क्रमांकास दोन लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपल्या प्रभागासह ग्रामपंचायतींना बक्षिसे मिळवून स्वच्छतेचा वसा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.