पिंगळी तलावात पंधरा दिवसात पाणी सोडा


दहिवडी : पंधरा दिवसात कामे पूर्ण करून पिंगळी तलावात उरमोडीचे पाणी सोडावे, तसेच पाणीटंचाई वर मात करण्यासाठी टँकरपेक्षा पिण्याच्या पाण्याचे दूरदृष्टीने नियोजन करावे, त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देता येईल, अशा सूचना महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्‍यांना केल्या. राज्यातील दुष्काळी परिस्थिती असणारे तालुके लवकरच दुष्काळी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. माण तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ना. चंद्रकांत पाटील माण दौर्‍यावर आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ना. पाटील यांनी दुष्काळी भागातील वडगाव, बिजवडी, अनभुलेवाडी, थदाळे या गावांची पाहणी करून शेतकर्‍यांशी बांधावर जाऊन संवाद साधला. वडगाव येथे 50 फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीची पाहणी केली. बिजवडी येथे पाण्याअभावी जळालेल्या डाळिंबीची पाहणी करुन डाळिंब उत्पादकांच्या अडचणी समजावून घेतल्या. थदाळे येथे जळालेल्या मका पिकांची पाहणी करून शेतकर्‍यांची विचारपूस केली. अनभुलेवाडी येथे कोरड्या विहिरी व जळलेली पिके पाहून गावोगावी टँकर सुरू करण्यापेक्षा पाण्याचे मूळ स्रोत शोधून ते सुधारा. कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी योजना आखा. लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन देवू, अशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या.

दरम्यान, माण येथे शंभराहून अधिक नव्याने शेततळी झाली आहेत. या शेततळ्यात अस्तरीकरण करण्यासाठी शेतकर्‍यांना अनुदान द्यावे, अशी मागणी डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रा. विश्‍वंभर बाबर यांनी निवेदनाद्वारे केली.

No comments

Powered by Blogger.