Your Own Digital Platform

इथे भरते विविध पक्षांची शाळा


कराड : एकीकडे चिमण्यांची संख्या दुर्मीळ होत असतानाच कराडमध्ये शिवाजी सोसायटीमधील एका बागेमध्ये रोज चिमण्यांचा चिवचिवाट, असतो. तर भारद्वाजाचे गुंजण, सुंदर वीण वीणून घरटे बांधणारी सुगरण, मधूर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी कोकीळा, रंगसंगतीत न्हाहणारा खंड्या अशा विविध पक्षांचे किलबिलाट ऐकावयास मिळते.

शिवाजी सोसायटीमधील नागरिक प्रचंड निसर्गप्रेमी आहेत. प्रत्येकाने आपआपल्या परीने घराभोवती बागा तयार करून फुले, पाने व फळांच्या संगतीत निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण केले आहे. याच सोसायटीमधील सुनिता सुरेश शिंदे यांनी आपल्या घराभोवती सुंदर बाग तयार केली आहे. या बागेमध्ये विविध जातीची फुले, फळांचे वृक्ष आहेत. सिताफळ, आवळा तसेच विविध औषधी वनस्पतींची झाडे आहेत. याच बागेत दररोज चिमणी, भारद्वाज, खंड्या, कोकीळा आदी पक्षी बागडत असतात. दररोज 25 हून अधिक चिमण्या अंगणात दाणे टिपत असतात. यामध्ये पिवळ्या चिमण्यांची संख्या अधिक प्रमाणात असते. तर घरापाठीमागे असणार्‍या पाण्याच्या छोट्या हौदात दिवसभर या पक्षांचा आंघोळीचा खेळ सुरू असतो. पक्षांचे गुंजन दिवसभर या बागेत ऐकावयास मिळते. गेल्या अनेक वर्षापासून शिंदे कुटुंबियांनी या पक्षांना आपलेसे केले आहे.

खाण्यासाठी दाणे टाकले तर झाडावरून चिमण्यांचा थवा अंगणात दाणे टिपत असतो. दिवसभर या चिमण्या पाण्याच्या हौदावर बसून एकमेकांना आंघोळ घालत असतात. या हौदातील पाणी दररोज बदलले जात असल्याचे सौ. शिंदे यांनी सांगितले.

पर्यावरणातील जैव साखळीत प्रत्येक घटक महत्वाचा असतो. यातील साखळीची एक कडी जरी तुटली तर त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. पर्यावरणाचा ढासळत चालेला समतोल,मनुष्याची निसर्गातील वाढती ढवळाढवळ, चिमण्यांची ग्रामीण भागात होणारी शिकार, बेसुमार वृक्षतोड आणि झपाट्याने वाढत चाललेले शहरीकरण अशी एक न अनेक करणांनी चिमण्यांची संख्या दुर्मिळ होत आहे. त्यामुळे‘जागतिक चिमणी दिन’ सुरू झाला. किमान त्यानिमित्ताने का होईना मानवाला चिमण्यांची आठवण रहावी, चिमण्यांसाठी काहीतरी केले जावे हा यामागचा उद्देश. असे असताना घरातल्याच बागेत चिमण्यांची राखण करण्यासाठी काही नागरिकांकडून प्रयत्न होत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे.