आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

दिवाळीत मटण स्वस्त होण्याची चिन्हे


भुईंज : दिवाळीतल्या सुट्ट्या भाऊबीज ग्रामीण भागातील यात्रा हंगाम व गोंधळ जागरण या पार्श्‍वभूमीवर पाचवडच्या बाजारात कोकणसह इतर भागांतून देशी बोकड व बकर्‍यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.त्यामुळे ऐन दिवाळीत मटणाचे दर कमी होण्याची शक्यता विक्रेते व व्यवसायिकांनी व्यक्‍त केली आहे. दसरा झाल्याने ग्रामीण भागातील ग्रामदैवत यात्रा हंगाम सुरू झाला आहे. 

यातच दिवाळीची भाऊबीज व सुट्ट्यांमुळे चाकरमानी व मुंबईकर गावाकडे आल्यानंतर देवदेवतांच्या गोंधळ जागरण या कार्यक्रमासाठी बकरी खरेदी करण्याचा हंगाम सुरू होतो. या पार्श्‍वभूमीवर राज्यात प्रसिध्द असलेल्या पाचवडच्या बाजारात बोकड व बकर्‍यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. याशिवाय सातारा शहर तसेच कराड, फलटण, वाई येथेही ही आवक वाढली आहे. त्यामुळे साहजिकच ऐन दिवाळीत मटणाचे दर कमी करावे लागणार आहेत. 

याबाबत संबंधित व्यवसायिक व विक्रेत्यांनी दुजोरा दिला असून आवक कशी राहणार? यावर दर निश्‍चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोहा, अलिबाग यासह कोकणात जाणार्‍या व्यापार्‍यांनी मटणाचे दर कमी होणार असल्याचे सांगितले.