Your Own Digital Platform

दीपोत्सव पाच दिवसांवर; शाहूनगरीत खरेदीसाठी गर्दी


सातारा : मांगल्याचे प्रतीक असलेल्या दीपावलीतील महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन असून यासाठी लागणार्‍या केरसुनीला विशेष महत्त्व असते. त्यामुळे या लक्ष्मीला मागणी वाढल्याने तिचे दरही वाढल्याने सर्वसामान्यांची ‘लक्ष्मी’ यंदा चांगलीच महागली आहे. दरम्यान लक्ष लक्ष दिव्यांचा दिपोत्सव पाच दिवसांवर येऊन ठेपला असून नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे.लक्ष लक्ष दिव्यांचा दीवाळ सण नरकचतुर्थी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज हे महत्वाचे दिवस. यामध्ये लक्ष्मी पूजन हा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. 

या दिवशी घरोघरी धनाचे पूजन केले जाते. दिवाळीत घर आणि आंगण उजळून टाकणार्‍या पणत्यांइतकेच मोल केरसुणीला असते. हिंदु परंपरेनुसार घरातील केरसुणी म्हणजे लक्ष्मी मानली जात असून लक्ष्मीपूजनामध्ये तिला विशेष महत्वाचे स्थान दिले जाते. आधुनिक जीवन शैलीमध्ये सहसा वापरात नसलेल्या केरसुणीचे लक्ष्मीपूजनाला मात्र मानाने पाटावर पूजन केले जाते. धन, पैसे, सोने याबरोबरच केरसुणीलाही स्थान दिले जाते.त्यामुळे दिवाळीच्या खरेदीमध्येही या ‘लक्ष्मी’ ची खरेदी ही अग्रस्थानी असते.

केरसुनी बनवण्यासाठी प्रामुख्याने खजुरांच्या झाडाची साल व फांद्या यांचा वापर होतो. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या ठिकाणांहून केरसुणीच्या फडांची खरेदी करण्यात येते. मात्र, या ठिकाणी यावर्षी कमी पाऊस झाल्याने या कच्च्यामालाचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे केरसुणीचे उत्पादनही घटले आहे. परिणामी केरसुणीची किंमत वधारली आहे. दरवर्षी 40 ते 50 रुपयांना मिळणारी ही केरसुणी यावर्षी 60 ते 70 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लक्ष्मीची खरेदी यंदा दरवर्षीपेक्षा चढ्या भावाने करावी लागत आहे. अलिकडे केवळ लक्ष्मीपूजनासाठी छोटी केरसुणीही बाजारपेठेत मिळू लागली आहे.केरसूणीबरोबरच विविध प्रकारच्या झाडूंचीही दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर खरेदी केली जात असल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत दिसत आहे.

केरसुणी तयार करण्याची एका विशिष्ट वर्गातील लोकांची परंपरागत कला आहे. मात्र, बदलत्या जमान्यासोबत या कारागिरांच्या नवीन पिढीमध्ये या कारागिरीबाबत उदासीनता असल्यामुळे जुन्या जाणकारांकडूनच केरसुण्या तयार केल्या जात आहे. या ‘लक्ष्मी’ तयार करण्याच्या परंपरागत कलेची जोपासना करुन ती टिकवणे गरजेचे आहे.

दीपोत्सवासाठी आवश्यक असणार्‍या विविधरंगी रांगोळ्याही बाजारात आल्या असून या रांगोळ्यांचेही दर आता चांगलेच वाढले आहेत. लक्ष लक्ष दिव्यांचा उत्सव असणारा हा दीपोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपल्याने विविध प्रकारचे कपडे, फटाके, आकाशकंदिल आदी साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.