सातार्‍यात धुवाँधार पावसाने त्रेधातिरपिट


सातारा : सातारा शहराच्या काही भागात रविवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ऐन दिवाळीत अचानक आलेल्या या पावसामुळे व्यापार्‍यासह नागरिकांची ताराबंळ उडाली.सातारा शहर व परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारी जिल्ह्याच्या काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारी सकाळपासूनच शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली . शहराच्या काही भागात सुमारे अर्धा तास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी होती. 

मात्र रविवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरीमुळे मोती चौक, राजवाडा, बसस्थानक परिसर, खणआळी, जुना मोटार स्टँड , झेडपी परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात उघड्यावर विविध वस्तू विक्रीसाठी बसलेल्या छोट्या मोठ्या व्यापार्‍यांची एकच तारांबळ उडाली. अनेक विक्रेत्यांचे साहित्य भिजल्याने त्यांना चांगलाच फटका बसला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच ताराबंळ उडाली.

महाबळेश्‍वर व परिसरात रविवारी दुपारी धुवाँधार पाऊस बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पर्यटनासाठी आलेल्या हौशी पर्यटकांनी या मुसळधार पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

महाबळेश्‍वर आणि पाऊस हे समिकरण किती घट्ट आहे याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांपासून येत असून शनिवारप्रमाणेच रविवारीदेखील शहर व परिसरात पावसाने धुवाँधार बॅटिंग केली. वातावरणात सकाळी उष्मा जाणवत होता मात्र, दुपारी तीननंतर ढगाळ वातावरणात मेघगर्जनेसह मुसळधार पावसास सुरुवात झाली. अचानक कोसळलेल्या पावसाने स्थानिकांसह पर्यटकांची मात्र चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. दुपारी चारनंतर पावसाची रिपरिप कमी झाली.

वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पर्यटनास आलेले पर्यटक मात्र खुश झाले. महाबळेश्‍वर आता दिवाळी हंगामासाठी सज्ज झाले असून हळू हळू पर्यटकांची पावले निसर्गरम्य पर्यटनस्थळाकडे वळू लागली आहेत.

No comments

Powered by Blogger.