Your Own Digital Platform

कासव, मांडुळाची तस्करी; ५ अटकेत


औंध : कासव व मांडुळाची तस्करी करणार्‍या पाच संशयितांना औंध पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे पावणेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.सुनील लोखंडे (वय 34, रा. संगमनगर, सातारा), रोहन राऊत (21, रा. बिदाल), शिवलिंग दुबळे (26, रा. दहिवडी), सागर मदने (23, रा. कोकराळे), प्रसाद जाधव (22, रा. खोकडवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील मुख्य संशयित सूरज अशोक जाधव (रा. खालची अंभेरी, ता. कोरेगाव) याने पोलिसांची चाहूल लागताच पोबारा केला.

 शनिवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास सूरज जाधव हा आपल्या साथीदारांसह चौकीचा आंबा ते रहिमतपूर रस्त्यावर अंभेरीनजीक कासव व मांडुळाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती औंध पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने छापा मारुन पाच जणांना मुद्देमालासह अटक केले. या छाप्यात एक बलेनो कार, एक निळ्या रंगाचे प्लास्टिक बॅलर आढळून आले. या बॅलरमध्ये कासव मिळून आले. पोलिसांनी एक लाख रुपये किंमतीच्या कासवासह रोख सोळा हजार पाचशे रुपये, बावन्न हजार रुपये किंमतीचे सहा मोबाईल सेट व पाच लाख रुपये किंमतीची बोलेनो कार असा एकूण 6 लाख 68 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पाच जणांविरोधात औंध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल वडनेरे, सपोनि सुनील जाधव, पोलिस हवालदार सुभाष काळेल, प्रशांत पाटील, नितीन सजगणे, कुंडलिक कटरे, सागर पोळ यांच्या पथकानेही कारवाई केली.