आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

कराड तहसीलकडून महिला आंदोलकांची चेष्टा


कराड : गोरगरीब, महिला, वयोवृध्दांसाठी काम करत असल्याचा कळवळा दाखविणारे महसूल प्रशासन वास्तवात किती निर्दयी आहे, याची प्रचिती कराड तहसील कार्यालयात गुरूवारी आली. रेशनधान्य, घरकुल, पेन्शन आदी मागण्यांसाठी वयोवृध्द शेकडो महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता, पण त्यांना बेदखल करत अधिकारी निघून गेले. त्यामुळे तीन तासाहून अधिक काळ महिला रस्त्यावर बसून होत्या.

बहुजन सामाजिक संस्थेच्या वतीने तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. विधवा, निराधार, अपंग, वृध्द व मागासवर्गीय समाजातील चारशेहून अधिक महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. घरकुल, पेन्शन, रेशन धान्य आदी प्रशासनाच्या आखत्यारीतील माफक मागण्या आंदोलकांच्या होत्या. संस्थेचे अध्यक्ष संतोष माने यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. भर दुपारी मोर्चा तहसील कार्यालयावर आला. मोर्चातील अनेक महिला अनवाणी चालत मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोलमजुरी करणार्‍या आणि हातावर पोट असणार्‍या या महिला मोठ्या आशेने आल्या होत्या. तहसीलदारांनी आंदोलनस्थळी येऊन आमचे गार्‍हाणे ऐकावे, येवढीच माफक अपेक्षा त्यांची होती. तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर न येता कार्यालयातच बसून राहिले.

दरम्यान प्रांताधिकारी त्या ठिकाणी आले. त्यांनीही आंदोलकांची विचारपूस करण्याचे औदार्य दाखविले नाही. काही वेळाने दोघेही कामानिमित्त तेथून निघून गेले. तहसीलदार न भेटताच निघून गेल्याने आंदोलक महिलांनी संताप व्यक्त केला. साहेबांची भेट घेतल्याशिवाय आम्ही येथून हालणार नाही असा पवित्रा घेत महिलांनी रस्त्यावरच ठाण मांडले. उपाशीपोटी तीन तासाहून अधिक काळ महिला रस्त्यावर बसून होत्या. बाहेर गेलेले तहसीलदार तासाभरानंतर कार्यालयात आले. यानंतर आंदोलक महिलांनी त्यांना निवेदन दिले आणि आपली नाराजीही व्यक्त केली.