आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

ग्रेडसेपरेटरच्या नियोजनाचा फज्जा


सातारा : सातार्‍यात पोवईनाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटर कामाचे नियोजन व्यवस्थितरीत्या झाले नसल्याने कामाचा फज्जा उडाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भारत संचार निगम (बीएसएनएल) आदी यंत्रणांना त्याचा फटका बसला असून, सर्वसामान्यांचेही हाल होत आहेत. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांची तोडफोड होत असतानाच बीएसएनलही ‘आऊट ऑफ कव्हरेज’ झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून पोवईनाक्यावर ग्रेडसेपरेटरचे काम सुरू आहे. 

प्रारंभी हे काम सुरू करताना कामाचे नियोजन केले आहे, असे चित्र दिसत होते. खालचा रस्ता वाहतुकीसाठी पोवईनाक्यावर खुला केला असला, तरी इतर रस्ते अद्याप सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नगरपालिकेकडे असणारा सिव्हिल रस्ता आणि पीडब्ल्यूडीचा लोणंद रस्ता जोडला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, हे रस्ते जोडणे दूरच, असलेले रस्ते बंद आणि निमुळते होत गेले आहेत. रस्ते उपलब्ध करून न देता नव्याने रस्ते खोदून पीडब्ल्यूडी हे काम उरकण्यात खूपच घाई करत असल्याची चर्चा सातारकरांमध्ये आहे. रस्ते खोदकामास घेतले जात असतानाच सेवा रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने समस्येत भर पडत असल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.

ग्रेडसेपरेटर कामाचे नियोजन नसल्याने सातारकरांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आयडीबीआय बँकेसमोर ‘ऊंट की सवारी’चा अनुभव येत आहे. तेथील रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामध्ये पाणीही साचत आहे.

या कामामुळे अनेक रस्ते निमुळते झाले असून या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहेच पण खोदकाम करताना जलवाहिन्या फुटत आहेत. नळकनेक्शन उखडून निघत आहेत. याबाबत माहिती न घेताच उकराउकरी केली जात असल्याने नव्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. बीएसएनएल तसेच वीजवितरणच्या केबल खोदकामामुळे उघड्या पडल्या आहेत. काही ठिकाणी या केबलचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचा फटका नागरिकांना बसत आहे. शिवाय संबंधित विभागांनाही मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. दुरुस्तीच्या कामास वेळ लागत असल्याने सर्व व्यवहार ठप्प पडत आहेत. याचा विचार करुन संबंधित विभागांनी नव्याने रस्त्यांची खोदकामे करताना काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

सातार्‍यातील ग्रेड सेपरेटरच्या कामात सातारा पालिका तसेच पीडब्ल्यूडीची भूमिका महत्वाची आहे. हे काम पीडब्ल्यूडीचे असले तरी या कामात येणारे रस्ते दोन्ही विभागांचे आहेत. सेवा रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही दोन्ही यंत्रणांची आहे. मात्र दोन्हीही विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ग्रेडसेपरेटच्या कामाचे योग्य नियोजन होताना दिसत नाही. सातारा नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुलर्ंक्ष का? असा सवाल केला जात आहे.