Your Own Digital Platform

माध्यमांची जनहितार्थ भूमिका सत्ताधार्‍यांना झोंबली


कोरेगाव : रहिमतपूर नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने जनतेच्या प्रश्‍नावर प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला होता. ही बाब सकारात्मक घेण्याऐवजी सत्ताधार्‍यांनी उलट आगपाखड करणारी भूमिका घेतल्याने पालिका वर्तुळात आश्‍चर्य व संताप व्यक्‍त होत आहे. विकासाभिमुख वार्तांकन करणार्‍या माध्यमांची भूमिका का झोंबली? असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान, पालिका सभेत विषय पत्रिकेवरील दोन विषय वगळता अन्य 21 विषयांना मंजुरी देण्यात आली. एस.टी.स्टँड कमंडलू नदीमार्गे प्राथमिक आरोग्य केंद्र हा नकाशावर नोंद असणारा रस्ता व मोहल्ला येथील अतिक्रमण हे संवेदनशील दोन विषय तहसिलदारांच्या अखत्यारित येत असल्याने ते तहकूब ठेवण्यात आले.

 नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपनगराध्यक्ष विद्याधर बाजारे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.स्वीकृत नगरसेवक सुनिल माने, माजी उपनगराध्यक्ष बेदील माने यांना कमंडलू नदी पात्र स्वच्छतेबाबत नागरिकांनी घेतलेले आक्षेप चांगलेच झोंबल्याचे या सभेत दिसून आले. वृत्तपत्रांनी याप्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी व्यक्‍त केलेली नाराजी नागरिकांसाठी आश्‍चर्यकारक ठरली. प्रसारमाध्यमे जनतेच्या प्रश्‍नांबाबत नेहमीच आवाज उठवत असतात. मात्र, पालिका सभेच्या अनुषंगाने माध्यमांनी उपस्थित केलेल्या मुद्याबाबत त्यांनी आगपाखड करत पालिका सभेला पत्रकारांना उपस्थित राहू द्यायचे की नाही? याबाबत विचार करावा लागणार असल्याचे वक्‍तव्य केल्यामुळे नागरिक व विरोधी नगरसेवकांनीही त्यावर टिकेची झोड उठवली. पत्रकारांनीही याप्रश्‍नी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे सर्वसाधारण व विशेष सभेचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. 

दरम्यान, विरोधी पक्ष नेते निलेश माने यांचे नाव न घेता सुनिल माने यांनी उठसुठ कोणीही जिल्हाधिकारी यांच्याकडे जावून कामांची अनुदान मागणी यादी देत असेल तर ते रहिमतपुरच्या वैचारिक परंपरेला साजेशी नाही. तसेच कोणताही आमदार हे निमंत्रक सदस्य असतात. ते निमंत्रीत सदस्य आहेत त्यामुळे नगरपालिकेचा हक्क असल्याचे वक्तव्य केले. यावर संतप्त झालेल्या निलेश माने यांनी आपण काही तरी असंबंध व अवांतर बोलू नये, असे त्यांना सुनावले.

ब्रम्हपुरी स्मशानभुमीचे सुमार दर्जाचे झालेले काम, शासकीय परमीटच्या नावाखाली अवजड वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची झालेली दूरवस्था याशिवाय गेल्या नऊ वर्षापासून सुरु असलेले मात्र अद्यापपर्यंत लोकार्पण न झालेली पाणी वितरण योजना याविषयांना माध्यमांनी वाचा फोडली होती.