Your Own Digital Platform

वडूजमध्ये शस्त्रांचे आगार जप्त


वडूज : वडूज येथे ‘टायगर’ नावाचा ग्रुप काढून त्याचे कार्यालय थाटून त्यात गावठी पिस्तूलांसह, तलवारी, कुर्‍हाड, गुप्ती अशी 11 धारदार शस्त्रे बाळगणार्‍या शैलेश जाधव याच्या वडूज पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दोन गावठी पिस्तूलांसह पाच जिवंत काडतुसे असा 11 लाख 25 हजार रुपयांचा शस्त्रास्त्राचे आगार सापडल्याने वडूज शहर हादरुन गेले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वडूज येथील आयलँड चौकाशेजारी कराड-दहिवडी रोडलगत शैलेश जाधव याच्याकडे हत्यार असल्याची माहिती वडूज पोलिसांना मिळाली.माहितीबाबत खातरजमा झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे पोलिसांनी शैलेशला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे सापडली. 

पोलिसांनी त्याची प्राथमिक माहिती घेण्यास सुरुवात करत त्याच्या घरामध्ये व टायगर नावाच्या कार्यालयातही छापा टाकला. पोलिसांनी घराची व कार्यालयाची झडती घेतली असता सापडलेल्या हत्याराने पोलिसही चक्रावून गेले. या छापामारीत पोलिसांनी 2 गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, 3 तलवारी, 1 सत्तूर, 1 गुप्ती, 2 कुर्‍हाड, 5 मोबाईल, लॅपटॉप, 2 चैनी, 2 अंगठ्या, 5 घडाळे, रोख रक्कम व चारचाकी कार आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन ही हत्यारे जप्त केली. वडूज पोलिस ठाण्यात याप्रकरणी त्याच्याविरुध्द आर्म अ‍ॅक्ट, शासकीय कामात अडथळा यासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी 2 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

पोलिस उपअधिक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि यशवंत शिर्के, फौजदार अविनाश राठोड, पोलिस हवालदार राजेंद्र जाधव, सतीश कर्पे, पोपट बिचुकले, गणेश कापरे, किशोर भोसले, सागर भुजबळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.