Your Own Digital Platform

टेबललँडवरील घोडेचालकांना लागणार लगाम


पाचगणी : पाचगणी येथील टेबललँडवर घडलेल्या दुर्घटनेत पर्यटकाचा घोड्यावरुन पडून झालेल्या मृत्यूमुळे टेबललँडवरच्या घुडसवारीच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून पाचगणी पालिकेने घोडेचालकांच्या घोड्यांना अधिकृत परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यामुळे टेबललँडवरील घोडेचालकांच्या बेजबाबदारपणाला लगाम बसणार आहे.गेल्या सप्ताहात मुंबईच्या एका पर्यटकाचा घुडसवारी करताना पडून मृत्यू झाल्याने घोडेचालकांचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आल्याने नगरपालिकेकडून घोडेचालकांविरोधातआता प्रभावी व काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी होणार आहे. 

घोडेचालकांनी यापुढे पोलीस स्टेशनकडून चारित्र्य पडताळणी करुन घेणे बंधनकारक केले जाणार आहे त्याचबरोबर घोड्याची वैद्यकीय तपासणी करुन घेवूनच घोडेसवारीचा परवाना घोडे चालकांना मिळणार आहे. घोडेचालकांना घोडेस वारीकरीता हेल्मेटची सक्ती केली जाणार असून घोडेचालकांना परवाना मिळाल्यावर त्यांना अधिकृत ओळखपत्र दिले जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गावरुनच घोडेसवारी करावी लागणार असल्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे .

जगातील दोन नंबरचे पठार म्हणून ओळख असलेल्या टेबललँडवर हजारो पर्यटक भेट देतात. मात्र, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न अलिकडे ऐरणीवर आला आहे. टेबललँडच्या पोलीस चौकीला जागा व इमारत देण्याकरीता सकारात्मक प्रयत्न पालिकेकडून होत असताना एसपी साहेबांनी याठिकाणी पोलिसचौकी उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.