Your Own Digital Platform

एसटी व कार अपघातात एक ठार; एक जखमी


कराडः कराड- विटा रस्त्यावर कराड तालुक्यातील हजारमाची गावच्या हद्दीत एसटी व कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. गुरुवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कराड-विटा मार्गावर विट्याकडून कराडकडे येणारी एसटी व कराडहून विट्याकडे निघालेल्या कारची हजारमाची गावच्या हद्दीत समोरासमोर धडक होवून अपघात झाला. या अपघातात गौरव सुभाष गाडेकर (वय २७, रा. यदोगोपाळ पेठ, सातारा) हा युवक जागीच ठार झाला. तर अक्षय राजाराम साळगावकर (वय २२, रा. सैदापूर, कराड) हा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह अपघात विभागाचे खलील इनामदार, प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला.

या दरम्यान, एसटी व कारमध्ये झालेल्या या अपघाताची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असतानाच पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एसटी व एस. आर. एस. ट्रॅव्हल्स यांच्यामध्ये दुसरा अपघात झाला. पोलिसांनी त्वरित अपघात स्थळी धाव घेतली. परंतू महामार्गावर झालेल्या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नव्हते. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून ट्रॅव्हल्स पोलिस ठाण्यात आणली आहे.