Your Own Digital Platform

लाईट बिल आले..३८ हजार, ६० हजार..!


कराडः वीज कंपनीच्या कराड उपविभागातील कारभाराबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उघड्या डीपीमुळे निरपराधांचे जीव जाणे, तारा तुटून ऊस जळणे असे प्रकार सुरू असताना अधिकारी मात्र जबाबदारीतून हात झटकत आहेत. शेती पंपाच्या कनेक्शनसाठी शेतकरी हेलपाटे घालत असताना वाढीव वीज बिलांचे चटके शेतकर्‍यांना देण्याचे काम वीज कंपनीमार्फत सुरु आहे.कराड उपविभागात शेती पंपाची शेकडो वीज कनेक्शन थकीत आहेत. केवळ विजयनगर सब डिव्हीजन ग्रामीण 2 विभागात मार्च 2013 पासून शेती पंपाची 260 वीज कनेक्शन बाकी आहेत. 

पाच वर्षानंतरही शेतकर्‍यांच्या शेतीपंपाला वीज मिळालेली नाही. सध्या इलेक्ट्रीक लाईन ओढण्याची कामे सुरू असून शेती पंपांना कनेक्शन लवकरच दिली जातील असे सांगितले जात आहे. कधी पर्यंत ही कामे पूर्ण होतील याचे उत्तर अधिकार्‍यांकडे नाही. खंडीत व कमी दाबाने होणार्‍या वीज पुरवठ्याने शेतकरी ग्रासला असताना काही महिन्यांपासून घरगुती व शेतीपंपांच्या भरमसाठ वीज बिलांमुळे शेतकरी, ग्राहक त्रस्त झाले आहेत.

वीज बिलांचे केंद्रिकरण झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी काही ग्राहकांना घरगुती 60 हजार, 1 लाखापर्यंत वीज बिले आली होती. अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कार्यालय स्तरावर बिले दुरूस्त करून सरासरीप्रमाणे सुधारीत बिले ग्राहकांना दिली होती. दहा हजारहून अधिक आणि पन्नास हजारहून अधिक बिले येणार्‍या ग्राहकांची यादी मोठी होती.

आटके येथील शेतकरी सुभाष महादेव पाटील यांना शेती पंपाचे 38 हजार 740 रूपये इतके वर्षाचे बिल आले आहे. या मोटारीवर त्यांचे साडेतीन एकर इतकेच क्षेत्र भिजते. यातही पावसाळ्यात तीन महिने मोटार बंदच असते. इतके बिल आले कसे? अशी विचारणा करण्यासाठी ते गेल्यानंतर रिडिंग प्रमाणे बिल आले आहे, असे सांगण्यात आले. पण येवढे रिडिंग वाढले कसे याचे उत्तर अधिकार्‍यांकडे नव्हते.

काले येथील सुनील लांजेकर यांना तीनशे ते चारशे रूपयांच्या दरम्यान घरगुती वीज बिल येते. मागील महिन्यात त्यांना 25 हजाराचे बिल आहे. वीज कंपनी कार्यालयात जाऊन त्यांनी बिल कमी करून आणले. युनिट जंप होण्याचे प्रमाण वाढले आहे. शंभराच्या पटीत येणारी वीज बिले अचानक हजारात येऊ लागल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यावर अधिकारी मात्र चकार शब्द काढाय तयार नाहीत.

मिटर रिडिंग घेण्यासाठी ठेकेदाराने नेमलेले कर्मचारी घरोघरी जातात. मोबाईलवर मिटरचा फोटो काढून ते वीज कंपनीच्या गु्रपवर अपलोड करतात. त्यानुसार भांडुप (मुंबई) येथील मुख्य कार्यालयातून बिले निघतात. मिटर जंप झाल्याने काहींचे युनिट 50 तर काहींचे 60 हजारपर्यंत चुकीचे नोंदले जाते. त्यानुसार भरमसाठ बिले निघतात. ते मिटर फॉल्टी आहेेत, हे मिटर रिडिंग घेणारा कर्मचारी पाहत नसल्याने ग्राहकांवर वाढीव बिलाचा भुर्दंड पडत आहे.