Your Own Digital Platform

भुकेने व्याकुळ बिबट्याचा आडात पडून मृत्यू


सातारा : भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याचा आडातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बामणवाडी येथे उघडकीस आली आहे.याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळे ता.कराड वन परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात बामणवाडी येथील देसाई भावकीचा एक आड आहे. मानवी वस्तीपासून बाजुला व ओढ्याच्या कडेला हा आड गेल्या ५० वर्षापासून आहे. तो वापरात नसल्याने तिकडे सहसा कुणी फिरकत नाही. शेजारीच आंब्याच्या झाडासह अनेक झाडे असल्याने तिथे वानरांचा एक कळप नेहमी आसतो. 

आज सकाळी अशोक देसाई आडाजवळच्या शेतात वैरण काढण्यासाठी गेले असता त्याना दुर्गंधी आली म्हणून त्यांनी आडात डोकावून पाहिले असता पाण्यात कांही तरी तरंगताना दिसले. मात्र नेमके काय कळत नव्हते त्यांनी अन्य लोकांना बोलावून घेतले व सर्वानी, निरखून पाहिल्यावर तो बिबट्या असल्याचे व फुगून वर तरंगत असल्याचे लक्षात आले तेंव्हा त्यानी पोलीस पाटील संभाजी पवार व येथील स्थानिक वन मजूर अरुण शिबे यांना खबर दिली नंतर शिबे यांनी वरिष्ठांना माहिती दिली.

वन विभागाचे वनक्षेत्रपाल अजित साजणे, सहा.वनरक्षक किरण साबळे वनरक्षक कुंभार, राठोड, वगैरे वनविभागाचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यावर स्थानिक लोकांच्या मदतीने सदर बिबट्याचा मृतदेह वर काढण्यात आला,पंचनामा झाल्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल खैरमोडे, त्यांचे सहाय्यक गजानन कुलकर्णी यांनी शवविच्छेदन केले. तेंव्हा सदर बिबट्या उपाशी असल्याचे व भक्षाच्या शोधात मानवी वसाहतीत घुसला असावा किंवा एकाद्या वानराला पकडण्यासाठी झेप टाकली असावी व त्या नादात दोन दिवसापूर्वी आडात पडलाअसावा असा अंदाज सांगितला.