Your Own Digital Platform

तडीपार गुंडाचा धुडगूस


सातारा : मोळाचा ओढा येथे राहणारा तडीपार मटकाकिंग समीर कच्छी याचा परिसरात अक्षरशः धुडगूस सुरू असून, बुधवारी मध्यरात्री साथीदारासोबत एका घरात घुसून तेथील 4 मोबाईल जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरातील त्याच्या वाढत्या कुरापतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.समीर कच्छी व अक्षय तळेकर (रा. हरपळवाडी, ता. कराड) या दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मितेश पोपट घाडगे (वय 23, रा. शाहूपुरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 तक्रारदार मितेश हे समीरकडे कामाला होते; मात्र सध्या त्यांनी काम सोडले आहे. बुधवारी मध्यारात्री समीर कच्छी त्याच्या साथीदारासोबत तक्रारदार यांच्या घरी गेला. यावेळी संशयितांनी सुरुवातीला दाराबाहेर अर्वाच्य शिवीगाळ करुन दारावर लाथा मारल्या. या घटनेने तक्रारदार घरातील गच्चीवर लपून बसले. घरातील महिलांनी दार उघडल्यानंतर समीर कच्छी याने घरात घुसून घरातील साहित्याची तोडफोड केली. ‘मितेश माझ्या अड्ड्यांची माहिती देतोय. त्याला सोडणार नाही. त्याला भेटायला पाठवून द्या’ असे म्हणून संशयितांनी घरातून जात असताना तेथील चार मोबाईल जबरदस्तीने चोरुने नेले. आई, पत्नीला शिवीगाळ केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.