Your Own Digital Platform

कामवाटपात झेडपी अधिकार्‍यांची दिवाळी


सातारा : जिल्हा परिषद सदस्यांच्या सेस फंडातील विविध कामांचे वाटप सातारा जिल्हा परिषदेत गुरुवारी झाले. या कामवाटपात अधिकार्‍यांची दिवाळी झाली आहे. अधिकार्‍यांच्या शिफारशीनुसारच टक्केवारीच्या विश्‍वासार्हतेवर मर्जीतील ठेकेदारांची तोंडे बघून कामांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप काहींनी केला. त्यामुळे झेडपीच्या कामवाटपातील पारदर्शकता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. ज्या अधिकार्‍यांच्या शिफारशींमुळे ही कामे देण्यात आली, त्यांच्यावर सीईओ डॉ. कैलास शिंदे कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या गटातील सुचविलेल्या कामांचे कामवाटप गुरुवारी सकाळी कृषी समितीच्या हॉलमध्ये अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी बांधकाम उत्तरचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील व दक्षिणचे कार्यकारी अभियंता एस. बी. रोकडे उपस्थित होते. कामे घेण्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह ठेकेदारांची चांगलीच गर्दी झाली होती.

काम वाटपात रस्ते, गटर, शाळा दुरूस्ती, स्मशानभूमी रस्ते अशी सुमारे 3 लाखापर्यंत कामे घेतली जातात. शासन निर्णयानुसार 3 लाखांवरील कामे ऑनलाईन टेंडरींग प्रक्रिया राबवून संबधित ठेकेदारांना दिली जातात. मात्र, ही 3 लाखांच्या आती कामे असल्याने अधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांच्या संगनमताने हेवीवेट कमिशन पाहून मर्जीतील ठेकेदारांना देण्यात आली. नियमानुसार यामध्ये सुशिक्षीत बेरोजगार संस्थांना 33 टक्के, खुल्यांना 34 टक्के तर मजूर संस्थांना 33 टक्के कामांचे वाटप केले जाते. मात्र, यामध्ये बराच घोळ झाला असल्याचे ठेकेदारामधून बोलले जात आहे.

प्रत्येक तालुक्यातील कामांची यादी जाहीर करून ठेकेदारांना बोलावून कामांचे वाटप केले जात होते. त्यामुळे कामे घेण्यासाठी यावेळी चांगलीच गर्दी झाली होती. कृषी विभागासह आयटीसेल मधील कर्मचारी व अधिकार्‍यांना या गर्दीतून वाट काढून जावे लागले. या काम वाटपामध्ये झेडपी सदस्यच आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच कामे देत असतात. तरीही आपल्याला एखाद दुसरे काम मिळेल या आशेने ठेकेदारांनी हजेरी लावली होती. मात्र, काम वाटप समितीमधील अधिकार्‍यांनी दिवाळीपूर्वीच काम वाटपात दिवाळी साजरी केली असल्याची चर्चा झेडपीत चांगलीच रंगली होती. अधिकार्‍यांनी तोंड बघून कामांचे वाटप केले गेले. तर काही कामे यापूर्वीच मॅनेज केली असल्याचा आरोप दबक्या आवाजात कामे न मिळालेल्या ठेकेदारांनी केला.

त्यामुळे सर्वत्र पारदर्शकपणाचा आव आणून आपला टेंभा मिरवणार्‍या अधिकार्‍यांनी मात्र कामवाटपात ठेकेदारांकडून दिवाळी काढली. तर अधिकारीही काम वाटप समितीने कामांचे वाटप पारदर्शकपणे केला असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे नक्की अधिकारी की ठेकेदारावर विश्‍वास ठेवायचा असा प्रश्‍न आता नागरिकांना पडला आहे. दरम्यान, संबंधित विभागाच्या टक्केवारीतच बहुतांश निधी खर्च होतो. त्यामुळे होणारी कामेही केवळ मलमपट्टी केल्यासारखी होत असतात. ती निकृष्ट दर्जाची होत असल्याने लोकप्रतिनिधींनी कामे करताना ती चांगल्या दर्जाची करा, अशी मागणी नागरिक करत आहेत. काम वाटप केले येथुन होणारी कामाची पाहणी, कामाचा दर्जा, गुणवत्ता याची तपासणी प्रत्यक्षात होणार का? फक्त कागदी घोडे नाचवले जाणार असा प्रश्‍न या कामवाटपामुळे निर्माण होत आहे.