Your Own Digital Platform

वसुबारस निमित्त गो-वत्स पूजन उत्साहात


सातारा : आनंदाचा सण समजला जाणार्‍या दिवाळी सणाची सुरूवात रविवारी वसुबारशीच्या गोवत्स पूजनाने झाली. शहरातील पंचपाळी हौद परिसरामध्ये सकाळी वसुबारस निमित्त गोवत्स पूजन करण्यात आले. लक्ष लक्ष दिवाळीची सुरुवात गोवत्स द्वादशीस म्हणजेच बसुबारसीने होते. वसुबारशीला गाईचे पूजन करुन नैवेद्य देण्याची परंपरा आहे. यावर्षीही रितीरिवाजाप्रमाणे शहरातील महिलांकडून गाय व वासरू यांचे पूजन करण्यात आले. हिंदु संस्कृतीमध्ये गाय पूजनीय व वंदनीय मानली असून तिला मातेचे स्थान दिलेले आहे. गाय मानवाला आपले सर्वस्व देते. 

गाईचे दूध पिऊनच मानव धष्टपुष्ट बनतो. गाय शेतात काम करून शेती पिकवते. तिच्या शेणाने उपयुक्त असे खत मिळते. गोमुत्र अनेक रोगांसाठी रामबाण औषध ठरते. जिने असे अनंत उपकार मानवावर केले आहेत. तिच्या प्रती या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरूषार्थ प्राप्त करून देणार्‍या गोमातेचे तिच्या वासरासह या दिवशी पूजन करून दिवाळीची सुरूवात होते. या जाणिवेतून आणि संस्कृतीचे जतन व पूजा करण्यासाठी या दिवशी विविध सामाजिक संस्थांच्यावतीने पंचपाळी हौद येथे गाय व वासरू उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच मल्हार पेठेतील तांबोळी समाजाच्या गोशाळेमधील गायींचेही शहरातील महिलांनी पूजन केले.