बाजार समिती आवारातून शेतकरी ‘हद्दपार’


सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकर्‍यांना सकाळी 6 ते 10 या वेळेत भाजीपाला विकण्याासाठी परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी शेतकरी बसणे अपेक्षित आहे. मात्र, काही जण येथे चिरीमिरी घेऊन दलालांना प्रवेश देत आहे. त्यामुळे बाजार समिती आवारातून शेतकरी हद्दपार होऊ लागला असून दलालांचे व किरकोळ व्यापार्‍यांचे साम्राज्य वाढत आहे. याकडे पदाधिकार्‍यांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये संतप्त वातावरण आहे.

सातारा बाजार समिती व्यापार्‍यांना पाठीशी घालत असल्याने शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजार समितीकडून शेतकर्‍यांचे हित न पाहता तोडपाणीवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. स्टँड परिसरात बाजार समितीचे भव्य कार्यालय आहे. या कार्यालय परिसरातच सुसज्ज असे आवार आहे. या ठिकाणी विविध सोयी सुविधा देऊन शेतकर्‍यांना त्यांचा शेतमाल विकण्याची परवानगी देण्यात येते. सकाळी 6 ते 10 या वेळेत शेतकरी आपला शेतमाल विकतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी शेतकरी कमी अन् दलाल व किरकोळ व्यापारीच जास्त दिसत असल्याने सर्वसामान्य शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. याबाबत बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेतली गेलेली नाही.

बाजार समितीच्या आवारात एक चिरीमिरी घेणारी व्यक्ति असून किरकोळ व्यापारी व दलालांकडून पैसे घेऊन शेतकर्‍यांच्या जागा त्यांना देत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना रस्त्यावर बसावे लागत आहे. ज्या शेतकर्‍यांसाठी बाजार समिती स्थापन केली आहे. त्याच शेतकर्‍यांना आता वार्‍यावर सोडण्यात आले आहे. रोज 50 ते 100 रूपये घेऊन ही व्यक्ति व्यापार्‍यांना बाजार समितीच्या आवारात शिरकाव करून देते. त्याचबरोबर पार्किंगमध्येही व्यापार्‍यांनी आपल्या जागा फिक्स केल्याने शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये खटके उडत आहे. मात्र, चिरीमिरी घेणार्‍या व्यक्तिला याचे काही देणेघेणे नसून या व्यक्तिचा बाजार समितीशी काही संबध नसताना दंडेलशाही करून शेतकर्‍यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

या प्रकरणात बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी लक्ष घालणे गरजेचे झाले आहे. सचिवांकडे याबाबत तक्रारी केल्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे एका व्यक्तिच्या चिरीमिरीसाठी शेतकरी वेठीस धरले जात आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार थांबण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

बाजार आवाराला दलालांचा विळखा सातारा बाजार समितीच्या आवारात दलालांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पोटावर पाय येत आहे. बाजार समितीच्या आवारात 100 ते 150 शेतकर्‍यांसाठी सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळपास 75 टक्के हे दलालच असल्याने शेतकर्‍यांना रस्त्यावर यावे लागत आहे. बाजार समिती आवार कमी पडत असल्याने किरकोळ व्यापारी व दलालांनी पाकिर्र्ग आणि फुटपाथही गिळंकृत केले आहे. त्यामुळे बाजार आवाराला दलालांचा विळखा बसला आहे. हा विळखा हटवण्यासाठी बाजारसमितीकडून कोणतेच प्रयत्न केले जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

No comments

Powered by Blogger.