आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

सदाशिवगड पाणी योजनेचा पाडव्याला होणार शुंभारंभ


कराड : ऐतिहासिक सदाशिवगडावरील पर्यटनाला चालना मिळावी तसेच गडावर वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांना नियमितपणे पाणी मिळावे, या हेतूने लोकवर्गणीतून हाती घेण्यात आलेल्या महत्त्वकांक्षी सदाशिवगड पाणी योजनेचा शुभारंभ ८ नोव्हेंबरला होणार आहे. करवडी (ता. कराड) येथील महालिंगेश्वर देवस्थान मठाधिपती शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने गेल्या ११ वर्षापासून सदाशिवगड संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. 

सदाशिवगड संवर्धनासाठी आजवर लोकवर्गणीतून लाखो रूपये जमा होऊन अनेक कामे पूर्ण झाली आहेत. सदाशिवगडावर "नक्षत्र उद्यान' ही साकारण्यात येणार आहे. याशिवाय गडावर जवळपास पाच हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने सदाशिवगडावर केलेले कार्य राज्यातील महत्वपुर्ण असे आहे.

गडावरील झाडांना नोव्हेंबरनंतर पाणी कमी पडते. उन्हाळ्यात तर तीव्र पाणी टंचाई असते. त्यामुळे अनेक झाडे पाण्याअभावी करपून जातात. याशिवाय गडावर दर्शनांसह व्यायामासाठी येणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळेच सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने महत्त्वकांक्षी पाणी योजनेचे काम होती घेण्यात आले आहे. याच पाईप लाईनचा ८ नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास डिचोली - बाबरमाची रोडलगत शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. योगेश कुंभार यांनी केले आहे.

बाबरमाचीतील एका विहिरीतून थेट पाईप लाईनद्वारे पाणी गडावर नेण्यात येणार आहे. यासाठी लोकवर्गणीचे काम हाती घेण्यात आले आहे. आजवर सुमारे तीन लाख रूपये जमा झाले असून योजनेचे एकूण अंदाजपत्रक सुमारे १७ लाखांच्या घरात जाते. हे काम तीन टप्प्यात केले जाणार असून विहिरीपासून पायथ्यापर्यंतचा पहिला टप्प्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांनी स्वयंस्फूर्तीने या पाईपलाईनसाठी मदत करत सदाशिवगड संवर्धनाचा एक भाग बनावे, असे आवाहन सदाशिवगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार यांनी केले आहे.