कोळेवाडीतील गणपती मंदिर फोडले, ४० हजारांवर डल्ला


कराडः कोळेवाडी ता. कराड येथील गणपती मंदिर चोरट्यांनी फोडले. मंदिराच्या शटरला लावलेले कुलूप तोडून चोरट्यानी दान पेटीतील चाळीस हजार रुपयांवर डल्ला मारला. ही घटना शनिवार दिनांक ३ रोजी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वारंवार अशा घटना घडत असल्याने भक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोळेवाडी गावच्या हद्दीत कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत असलेल्या गणपती मंदिरामध्ये गेली वीस वर्षांपासून विश्वास मोहिते हे पुजारी आहेत. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी देवाची पूजा करून दिवसभर ते मंदिर परिसरात थांबले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी मंदिर बंद केले. मंदिराचे शटर लावून त्याला कुलूप घातले. त्यानंतर ते रात्री घरी गेले. रविवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुजारी विश्वास मोहिते हे मंदिरात देवाच्या पूजेसाठी आले. परंतु, शटरचे कुलूप तोडून शटर उघडलेले त्यांना दिसले.


त्यामुळे त्यांनी लगबगीने मंदिरात जाऊन पाहिले असता मंदिरात ठेवलेली दानपेटी तेथे दिसली नाही. पुजारी विश्वास मोहिते यांनी मंदिराच्या इकडे तिकडे पाहिले असता मंदिरासमोर दान पेटी उघडी दिसली. ते दानपेटीजवळ गेले असता दान पेटीत भाविकांनी टाकलेली चिल्लर होती. मात्र, चलनी नोटा दानपेटीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पुजाऱ्यांनी ही बाब त्वरित वसंत भोसले व ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर काही वेळातच ग्रामस्थ मंदिरात जमा झाले. कुलूप तोडून दानपेटीतील सुमारे ४० हजार रुपये चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पुजारी विश्वास दाजी मोहिते यांनी याबाबतची फिर्याद कराड तालुका पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, कोळेवाडी येथील गणपती मंदिरात यापूर्वीही चोरीची घटना घडली होती. भाविक भक्तांनी मंदिरात दान पेटीत दान केलेली रक्कम चोरी होत असल्याने भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

No comments

Powered by Blogger.