Your Own Digital Platform

शिवचरित्र अभ्यासणारे अपयशी होत नाहीत : युसूफ हकीम


मारूल हवेली : ढासळलेले बुरुज, तुटलेले तट, उद्ध्वस्त गड हे इतिहासातील पराक्रमाची साक्ष देतात. ज्यांना शिवाजी हे नाव माहिती आहे, त्यांना त्यांचा संघर्षही माहिती आहे. शिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीत, असे प्रतिपादन शिव अभ्यासक युसूफ हकीम यांनी केले.पाटण येथे आधार सामाजिक संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अनिल मोहिते, सुनिल क्षीरसागर, डॉ. देशमुख, अ‍ॅड. प्रकाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

हकीम म्हणाले, जखमा ज्यांच्या अंगावर होतात जे लढतात, त्यांच्यावर नाही जे रडतात. एकेकाळी रयत वाचवण्यासाठी आमच्या गडकोटांनी त्यांच्या छातीवर शत्रूचे तोफगोळे झेलले. त्यामुळे एकेकाळी स्थापत्य शास्त्राची अद्भुत रचना असणार्‍या या गडकोटांची ही अवस्था झाली. महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास याच गडकोटांमुळे जिवंत आणि ज्वलंत ठेवला आहे. म्हणूनच दुर्ग भ्रमंती, दुर्ग संवर्धन होणे आवश्यक असून असे झाले तरच पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज कळतील.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे वेशभूषा करुन कळणार नाहीत. तर यासाठी शिवचरीत्र अभ्यासले पाहिजे. त्यातील बारकावे जाणून घेतले पाहिजेत. गडकोट किल्ल्यांची भम्रंती करुन ते न्याहाळले पाहिजेत, असे मतही हकीम यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान, यानिमित्ताने युसूफ हकीम यांना मिळालेले मानधन त्यांनी किल्ले सुंदरगड संवर्धनासाठी सुपुर्द केले. यावेळी शंकर कुंभार, निलेश फुटाणे, मनोहर यादव, महादेव खैरमोडे, काशिनाथ विभुते, सोमनाथ आग्रे, श्रीगणेश गायकवाड यांच्यासह आधार सामाजिक संस्थचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील ग्रामस्थ, युवक उपस्थित होते.