मागणी वाढल्याने कोयनेचा पाणीसाठा चिंताजनक


पाटण : चालू वर्षी कोयना धरणांतर्गत विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस व त्याचपटीत अधिक पाणीसाठा झाला. मात्र, पावसाच्याच महत्त्वपूर्ण काळात येथे सिंचन व वीज निर्मितीसाठी कमालीचा पाणीवापर झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिनाअखेर येथे गतवर्षीच्या तुलनेत तब्बल पंधरा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. धरणात सध्या 89.61 टीएमसी पाणीसाठा असला तरी सिंचनाची वाढती गरज, तसेच मागणी व पुरवठा लक्षात घेता आतापासूनच आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. चालू वर्षी कोयना धरणांतर्गत विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. याच काळात तब्बल 156.23 टीएमसी पाण्याची आवक झाली. तर, साठवण क्षमता लक्षात घेता, यातून तब्बल 56.45 टीएमसी पाणी विनावापर सोडून द्यावे लागले. एक जूनपासून सुरू झालेल्या येथील तांत्रिक वर्षातील पाच महिने संपले. यातील महत्त्वाचा पावसाचा कालावधी असतानाही येथे सिंचनासाठी 6.97, पूरकाळात 8.46, तर पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी 21.05 अशा एकूण 36.48 टीएमसी पाण्यावर 1073.089 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

आता धरणात 89.61 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी येथे यावर्षीच्या तुलनेत कमी म्हणजेच 121.40 टीएमसी पाणी आवक झाली होती. त्यावेळी सिंचनासाठी 3.33, पूरकाळात 2.48, पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी 19.80 अशा एकूण 25.61 टीएमसी पाण्याचा वापर करून 961.966 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली होती. त्याकाळात विनावापर केवळ 7.06 टीएमसी इतकेच पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे ऑक्टोबर महिनाअखेर धरणात तब्बल 104.28 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक होता.

तुलनात्मक फरक पाहाता चालूवर्षी जास्त पाऊस, जास्त पाणी आवक झाली. पण दुसर्‍या बाजुला त्याची जास्त मागणी झाल्याने झाल्याने त्याचा परिणाम शिल्लक पाणीसाठ्यावर झाला आहे. उन्हाची दाहकता, पूर्वेकडील अनेक विभागातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात सिंचनाची गरज अधिक पटीने वाढणार आहे.

त्यामुळे येणार्‍या सात महिन्यांचा तांत्रिक अभ्यास केला तर पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी आरक्षित कोठ्यापैकी उर्वरित 46.45 टीएमसी , सिंचनासाठी वाढत चाललेली मागणी पाहाता सुमारे 30 व मृतसाठा 5 अशा एकूण 81.45 टीएमसी पाण्याची आगामी काळात गरज आहे. त्याचवेळी धरणात 89.61 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. निश्‍चितच ही तांत्रिक आकडेवारी समाधानकारक वाटत असली तरी सध्याचा पाणीवापर व भविष्यातील सिंचनाची वाढती गरज लक्षात घेता येथे भविष्यात निश्‍चितच काटेकोर नियोजनाची आवश्यकता आहे.

No comments

Powered by Blogger.