आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

दुष्काळप्रकरणी मी खटावच्या जनतेबरोबर : उदयनराजे


सातारा : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी गावांमध्ये कायम बारमाही दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या खटाव तालुक्याचा समावेश का केला नाही? याची माहिती उघड झाली पाहिजे, असा कोणता बदल किवा चमत्कार झाला आहे की त्यामुळे खटाव तालुक्याला दुष्काळातुन वगळले आहे? असा संतप्त सवाल खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाचे काम म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशा तर्‍हेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

खटाव तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यास व त्यानुसार जरुर त्या उपाययोजना राबवणेकरीता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला वस्तुस्थिती पटवून देवू. खटाव तालुक्यातील जनतेच्या भूमिकेला आपले समर्थन असून असे नमूद करुन खा. उदयनराजे यांनी पुढे म्हटले आहे की, कायम दुष्काळी भाग म्हणून माण-खटाव तालुक्याला उभ्या महाराष्ट्रात ओळखले जाते. 

एका बाजूला अतिवृष्टी आणि एका बाजूला अवर्षण अशी स्थिती सातारा जिल्ह्याची आहे. तसेच गेल्या काही वर्षांत जलसंधारणाची कामे झाली असली तरी पिक पाण्याची आणेवारी पाहिल्यास, खटाव तालुका हा दुष्काळग्रस्त आणि अवर्षणग्रस्तच आहे. खटाव तालुक्याची पिक आणेवारीमध्ये फार काहीही फरक पडलेला नाही. तरीसुध्दा शासनाने खटाव तालुक्याला दुष्काळीगावांच्या यादीमधून वगळले असल्याने आश्‍चर्य तर वाटतेच, याकामी शासकीय अधिकार्‍यांनी टेबलमेड अहवाल तयार केला आहे का? असाही प्रश्‍न पडतो. प्रत्यक्ष पहाणी करुन अहवाल तयार केला आहे का? हे तमाम जनतेसमोर आले पाहिजे.

नेमकी माशी कुठे शिंकली ते शोधले पाहिजे. अशा पध्दतीने खटाव तालुक्यावर अन्याय होवू दिला जाणार नाही.जनतेने एकजुटीने, खटाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत होण्यासाठी संघटित लढा उभारला आहे, खटाव तालुक्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द खटाववासियांबरोबर आम्ही राहणार आहे, असेही खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.