Your Own Digital Platform

‘अन्यथा, अधिवेशन रोखणार...’


खटाव : राज्यसरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून खटावला वगळण्यात आले आहे. कायम दुष्काळी असणार्‍या खटावच्या वास्तव परिस्थितीचे सर्वेक्षण झाले नाही. पुन्हा एकदा आढावा घेवून खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.राज्याने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळसदृश्य तालुक्यांच्या यादीत खटाव तालुक्याचा समावेश करण्यात आला नव्हता. तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार्‍या लोकप्रतिनिधींनी पुन्हा सर्वेक्षण करून खटावचा समावेश दुष्काळी यादीत करावा अशी मागणी लावून धरली होती. 

गेल्या आठवड्यात विविध मंत्र्यांनी तालुक्याला भेटी देवून पहाणी केली होती. सर्वांनीच अश्वासन दिल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र बुधवारी जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून खटावला पुन्हा वगळण्यात आले आहे.

आ. जयकुमार गोरे यांनी गुरुवारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खटाव तालुक्यात त्वरित दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. खटाव तालुका नेहमीच अवर्षणप्रवण आहे. तरीही या तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळण्यात आले आहे. याचा अर्थ केंद्राचे निकष चुकीचे आहेत. अधिकार्‍यांनी चुकीचा अहवाल पाठविल्याचीही शक्यता आहे. सॅटेलाइट पहाणी करुन आढावा घेताना तालुक्यावर अन्याय झाला आहे. खटावला दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच खरिप वाया गेल्याने त्या हंगामाचे कर्ज सरकारने माफ करावे. 

रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत त्यामुळे एकरी पन्नास हजारांची मदत करावी आदी मागण्याही आ. गोरे यांनी केल्या. तालुक्यात सत्ताधारीच दुष्काळाचे राजकारण करु लागले आहेत. खरे तर हे सरकारचे अपयश आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कारभार करण्यात आला आहे. 19 तारखेच्या अधिवेशनात सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू, अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.