आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

‘कृष्णा’ दरात एक पाऊल पुढे राहील : डॉ. सुरेश भोसले


रेठरे बुद्रुक : बाजारपेठेतील साखरेच्या दरामध्ये हेणारे चढउतार आणि हुमणी किड व अपुरे पाणी यामुळे ऊस पिकावर झालेला परिणाम अशा कारणांमुळे सध्याचा काळ हा साखर उद्योगासाठी कसोटीचा काळ आहे. अशा परिस्थितीतही शेतकरी सभासदांचे हित लक्षात घेऊन कृष्णा कारखाना दरात एक पाऊल पुढेच राहिल, असा विश्‍वास यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. 

कारखान्याच्या 59 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.चेअमरन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना.डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्हा.चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, सुजीत मोरे, पांडुरंग होनमाने, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांची उपस्थिती होती.

डॉ. भोसले म्हणाले, साखरेचा भाव शासनाने 2900 रूपये केला आहे. मात्र तो पुरेसा नसल्याने यामध्ये कारखान्यांना एफआरपी देण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. हाच दर 3300 रूपयेपर्यंत केल्यास साखर कारखानदारी अडचणीतून बाहेर येऊ शकते. शेतकरी संघटनांनी ऊसवाहतूक व कारखाने बंद पाडण्याऐवजी साखरेला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. दरम्यान, गेल्या हंगामातील उर्वरित बिलाची रक्कम दिवाळीपर्यंत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ऊसदराबाबत येत्या आठवड्याभरात योग्य धोरण स्पष्ट होईल, असे सुतोवाच डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

ना. डॉ. अतुल भोसले म्हणाले, साखरेचे दर 3000 हून अधिक करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. एकीकडे साखरेचा साठा वाढत असला तरी दर कोसळत आहेत. अशा स्थितीत केंद्राने 6000 कोटींची मदत साखर उद्योगाला देऊ केली आहे. सभासदांना जास्तीत दर आणि कर्मचार्‍यांना जास्तीत जास्त पगार देण्यासाठी कारखान्याचे चेअरमन काटेकोरपणे नियोजन करत आहेत. प्रारंभी संचालक धोंडिराम जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमन जाधव यांच्या हस्ते वरदविनायक पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वजनकाट्याचे पूजन करण्यात आले. 

यावेळी कराड तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पवार, पैलवान धनाजी पाटील, रेठरे बुद्रुक विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष व्ही. के. मोहिते, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.