Your Own Digital Platform

‘कृष्णा सिंचन’चा कारभार कोलमडला


सातारा : जलसंपदा विभागाच्या कृष्णा सिंचन मंडळचा कारभार कोलमडला आहे. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंते जागेवर नसल्याने कर्मचार्‍यांची टंगळमंगळ सुरु असते. बरेचजण कार्यालयीन वेळेत बाहेर उंडारत असल्याचे चित्र आहे. कर्मचार्‍यांवर वरिष्ठांचा वचक नसल्याने विस्कळीतपणा आला असून या बेशिस्तपणामुळे कृष्णा सिंचन मंडळाचा कारभार कोलमडला आहे.कृष्णा सिंचन मंडळ इतर कार्यालयांच्या मानाने कायम दुर्लक्षित राहिलेला विभाग आहे. 

जिल्ह्यातील पाणीप्रकल्प आणि त्यातील सिंचनाचे नियोजन करण्याचे काम कृष्णा सिंचन मंडळ करते. जबाबदारीच्या मानाने या कार्यालयात कामे होताना दिसत नाहीत. या विभागात येणार्‍या शेतकरी खातेदारांची संख्या मोठी असते. मात्र, त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे चित्र या कार्यालयात पहायला मिळत आहे. बुधवारी सरदार वल्‍लभाई पटेल यांची जयंती साजरी केल्यानंतर कृष्णा सिंचनच्या कर्मचार्‍यांची शपथ घेतली. त्यानंतर कर्मचार्‍यांनी आपापल्या टेबलला काम करण्याऐवजी काहीजण कार्यालयातून बाहेर सटकले. कार्यालयीन कामकाज सुरु होण्यापूर्वीच त्यांची खाजगी कामे सुरु झाली. काहीजणांनी कँटिन गाठले. 

कार्यालय परिसरात उंडारणार्‍यांची संख्याही कमी नव्हती. या मंडळाअंतर्गत असलेले काही कार्यकारी अभियंते दुपारी 12 वाजून गेले तरी कार्यालयात उपलब्ध नव्हते. दुपारनंतर बरेच टेबल ओस पडले होते. कृष्णा सिंचन मंडळात अशी नेहमीच परिस्थिती असते. त्यामुळे कार्यालयात कामानिमित्‍ताने येणार्‍या शेतकर्‍यांची प्रचंड गैरसोय होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.

कृष्णा सिंचन मंडळात कार्यकारी अभियंत्यांवर वचक नसल्याने त्यांच्यात मनमानीपणा वाढला आहे. त्यांच्यात बेशिस्तपणा वाढला आहे. कामाचे कोणतेही टार्गेट नसल्याने त्यांच्यात मरगळ आली आहे. अंग झटकून कामे केली जात नाहीत. त्यामुळे अधीक्षक अभियंत्या वैशाली नारकर या विस्कळीत कामकाजात शिस्त आणतील का? बेशिस्त अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.